ईशान्य मुंबईच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा आपण तयार केला असून त्याच्या अंमलबजावणीनंतर या विभागाला नवी ओळख मिळेल आणि येथील लोकांचे जीवनही सुसह्य होईल. मात्र विरोधकांकडे व्हिजनच नाही. मतदार संघाच्या विकासासाठी एकही योजना नाही. त्यामुळेच ते मराठी- गुजराती असा भाषावाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंसाचाराचा आधार घेत आहेत. मात्र या मतदार संघातील मोदीप्रेमी मतदार विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल असा दावा ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीचे(भाजप) उमेदवार मिहीर कोटेचा यांनी केला.
या मतदार संघातील महत्वाच्या समस्या कोणत्या?
प्रामुख्याने ईशान्य मुंबईत सर्वांत महत्वाची समस्या आहे ती आरोग्याची. कांजुरमार्ग आणि देवनार येथील घनकचरा क्षेपणभूमीमुळे या मतदार संघात रात्रीच्या वेळी कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते. त्याचा लोकांना मोठा त्रास होतो. तसेच लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असून त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे महत्वाचे आहे. या मतदार संघातून पूर्व द्रुतगती महामार्ग जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्याही मोठी आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. भांडुप आणि विक्रोळी परिसरात एकही नाट्यगृह नाही. मराठी नाटक, कला आणि संस्कृती दाखवण्यासाठी या भागात चांगले सभागृह नाही. शिवाजीनगर-मानखुर्द मुंबईतील गुन्हेगारी लोकांचे आश्रयस्थान होत असून मुंबईत वितरित होणाऱ्या अंमलीपदार्थांचे केंद्र बनत असून कायदा- सुव्यवस्था आणि समाजाच्या दृष्टीने ही मोठी समस्या ठरत आहे.
हेही वाचा…मतदारसंघाचा आढावा : दक्षिण मुंबई, शिंदे गटासाठी उमेदवाराची वादग्रस्त प्रतिमा अडचणीची ठरणार ?
धारावी प्रकल्पबाधितांच्या मुलुंडमधील पुनर्वसनास स्थानिकांचा विरोध आहे. त्याबाबत आपली भूमिका काय?
मुंबईतील प्रकल्पबाधितांसाठी(पीएपी) मुलुंडमध्ये सहा ते सात हजार सदनिका बांधण्याचा विषय असो वा धारावी प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा, या दोन्ही प्रस्तावांना आपला विरोध असून आमदार म्हणूनही सुरूवातीपासूनच आपण याला विरोध केला आहे. प्रकल्पाबाबत विरोधक पहिल्या दिवसापासून निराधार आरोप करत आहेत. मात्र या प्रकल्पासाठी मुलुंडमध्ये एकही जमीन देण्यात आलेली नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील बाधितांच्या पुनर्वसनासाठी मुलुंड क्षेपणभूमीची जमीन मागण्यात आली होती. मात्र पुढील सहा वर्षे या क्षेपणभूमीवर कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याने तेथे कोणताही विकास प्रकल्प करता येणार नाही. त्यामुळे मुलुंडमधील नागरिकांनी विरोधकांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये.
हेही वाचा…मतदारसंघाचा आढावा : तिरंगी लढतीत भिवंडीत भाजपसाठी आव्हान कायम
प्रचारात मराठी – गुजराती हा वाद सुरू झाला आहे त्याबद्दल भूमिका काय आहे ?
विरोधकांकडे कार्यक्रम किंवा दिशा नाही म्हणून ते भाषा आणि हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत आहेत. गुजराती विरुद्ध मराठी असा वाद निर्माण करत आहेत. असा कोणताही वाद नाही. सारे गुण्यागोविंदाने राहात आहेत. पण मुद्दामच मराठी-गुजराती अशी दरी निर्माण केली जात आहे. मुस्लिम बहुल भागात मौलविंच्या फतव्यांच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. हिंसाचाराच्या मार्गाने आम्हाला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. महायुतीचे नेते- कार्यकर्ते ताकदीन लढत आहेत. विरोधकांचा भाषावादाचा कोणताही परिणाम या भागातील सुज्ञ मतदारांवर होणार नाही. मोदींचा विकास आणि हिंदु समाजाचे ऐक्यच या मतदार संघात जिंकणार आणि विरोधकांचे सर्व मनसुबे उधळले जाणार हे निश्चित.