Milind Deora interview : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी नुकतीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. १४ जानेवारी रोजी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आपल्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाबरोबर असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मंगळवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.
प्रश्न : तुम्ही पक्ष सोडू नये, यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कुणी तुमच्याशी संपर्क केला का?
उत्तर : नाही, मी पक्ष सोडू नये यासाठी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने माझ्याशी संपर्क केला नाही. मला फक्त काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला होता. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणाऱ्या दिवशी मी काँग्रेस पक्ष सोडू नये, अशी विनंती त्यांनी केली. हा प्रकार खूपच हास्यास्पद होता. त्यामुळे मी घेतलेला निर्णय योग्य आहे, अशी माझी खात्री पटली.
प्रश्न : तुम्हाला राहुल गांधींकडून संपर्काची अपेक्षा होती का?
उत्तर : मला यासंदर्भात पुन्हा सविस्तर बोलायचं नाही. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि काँग्रेस पक्षाचे मित्रपक्षांना शरण जाणं मला खटकत होतं, यासंदर्भात मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी स्पष्टपणे बोललो होतो. मुळात २०१९ मध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीत सहभागी होण्यास गांधी कुटुंबाची इच्छा नव्हती. उद्धव ठाकरेंबाबत काँग्रेस नेते काय विचार करतात, हे मला माहिती आहे.
हेही वाचा – भाजपमध्ये सामील होण्याच्या प्रस्तावाच्या गौप्यस्फोटामागे सुशीलकुमार शिंदे यांचे दबावाचे राजकारण ?
प्रश्न : ज्या पक्षाशी तुमचे मतभेद होते, त्याच पक्षात तुम्ही प्रवेश केला, हा विरोधाभास नाही का?
उत्तर : मला देशाची आणि मुंबईची सेवा करायची आहे. मला मुंबईसाठी काही तरी करायची इच्छा आहे. राजकारण करताना मी केवळ टीका करत नाही. सत्तेत कोण आहे, याचा विचार न करता मी नेहमीच योग्य त्या सूचना केल्या आहेत. ज्या पक्षात सकारात्मक धोरण राबवले जात नाही, अशा पक्षात राहणं मला योग्य वाटत नाही. काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही.
प्रश्न : विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर टीका करणे यात गैर काय?
उत्तर : विरोधी पक्षाने नक्कीच टीका करावी. परंतु, ती टीका रचनात्मक असावी, फक्त टीका करायची म्हणून टीका करू नये. निवडणुकीच्या वेळी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात काहीच गैर नाही. मात्र, सतत केलेली टीका मतदारांनाही आवडत नाही.
प्रश्न : तुम्ही काँग्रेस पक्ष सोडण्याचा अंतिम निर्णय कधी घेतला?
उत्तर : निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाबरोबर युती झाली होती. मात्र, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ही युती पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा आम्ही त्याला विरोध केला नाही. आम्ही त्यावेळी वरिष्ठांच्या निर्णयाचा आदर केला, पण ज्यावेळी एखादा पक्ष मित्रपक्षाला शरण जातो, तेव्हा चिंता वाढते.
प्रश्न : तुम्हाला २०२४ च्या निवडणुकीत दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं का?
उत्तर : नाही, पण मला तिकीट मिळेल याबाबत स्पष्टता नव्हती. खरं तर हा विषय केवळ निवडणुकीच्या तिकिटापुरता मर्यादित नव्हता. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरही माझी अनेकांशी चर्चा झाली होती. ज्याप्रमाणे दिल्लीत आम आदमी पक्ष आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला संपवले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा पक्षही काँग्रेस संपवेल, अशी भीती दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाच्या मनात होती, मी त्याला दुजारोही दिला होता. मुळात हेच उद्धव ठाकरेंचे अंतिम ध्येय होते. जर दिल्लीतील काँग्रेस नेतृत्व असा विचार करत असेल तर जागावाटपाबाबत पक्षाने अधिक सजग असायला हवं होतं. मात्र, काँग्रेस पक्षाचं असं मित्र पक्षांसमोर शरण जाणं, एकप्रकारे विचारधारेपासून दूर जाण्याचा प्रकार होता. यासाठी मला कोणा एका व्यक्तीला दोष द्यायचा नाही. मात्र, संपूर्ण पक्ष वास्तविकतेपासून दूर चालला आहे, हे मला मान्य नाही. जर काँग्रेस पक्ष एका मुंबई लोकसभेच्या जागेवर दावा सांगू शकत नसेल, तर अशा पक्षात राहण्यापेक्षा, ज्यांना माझी योग्य पारख आहे अशा व्यक्तींबरोबर जाणं केव्हाही योग्य, असं मला वाटलं. हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता.
प्रश्न : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेऐवजी भाजप हासुद्धा तुमच्यासाठी एक पर्याय होता का?
उत्तर : माझ्याकडे अनेक पर्याय होते. यापूर्वी अनेक पक्षांनी माझ्याशी संपर्क केला होता. यामध्ये काँग्रेसच्या काही मित्रपक्षांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे गटानेही माझ्याशी संपर्क केला होता. मात्र, मी सर्वांना नकार दिला. मात्र, जर एखाद्या ठिकाणी तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, तर तुम्हाला जीवनात पुढे जावं लागतं. मुख्यमंत्री शिंदे हे अतिशय योग्य व्यक्ती आहेत. त्यांना माझ्याकडून काय हवे आहे, हे त्यांनी त्यांच्या भाषणातही सांगितलं.
प्रश्न : काँग्रेसचे आणखी नेते तुमच्याबरोबर येतील का?
उत्तर : खूप मोठं पक्षांतर घडवायचा माझा प्रयत्न नव्हता. मात्र, राज्यात आणि देशातल्या बऱ्याच काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष आहे. काँग्रेस आपल्या विचारधारेपासून दूर होत असल्याचे त्यांचे मत आहे. गेल्या २४ तासांत मी अशा किमान १० ते १२ लोकांशी बोललो, ज्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केलं, मला समर्थन दिलं. पण, भविष्यात काय होईल सांगता येत नाही.
प्रश्न : लोकसभा निवडणुकीत तुम्ही दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार असणार आहात का?
उत्तर : मी सध्या याचा विचार करत नाही. याबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल.