काँग्रेसचे वरिष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असे असताना देवरा यांचा पक्षत्याग म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांत देवरा यांच्याप्रमाणेच वेगवेगळ्या राज्यातील दिग्गजांनी काँग्रेसला रामराम ठोकत अन्य पक्षांत प्रवेश केलेला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे
ज्योतिरादित्य शिंदे हे चार वेळा खासदार आणि केंद्रात मंत्री राहिलेले मध्य प्रदेशमधील दिग्गज नेते आहेत. ते ग्वालीयरच्या राजघराण्याचे सदस्य असल्यामुळे त्यांचे मध्य प्रदेशमध्ये वेगळे वजन आहे. त्यांनी मार्च २०२० मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्यासोबत इतर २२ आमदारांनीही काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. सध्या शिंदे हे केंद्रात विमान वाहतूक मंत्री आहेत.
जितीन प्रसाद
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना जितीन प्रसाद यांनी जून २०२१ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्यानंतर काँग्रेसच्या साधारण २३ मोठ्या नेत्यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला होता. २००१ सालापासून ते काँग्रेसमध्ये होते. सध्या प्रसाद हे उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत.
सुष्मिता देव
सुष्मिता देव या आसाममधील महत्त्वाच्या महिला नेत्या आहेत. त्यांच्याकडे आसामच्या ऑल इंडिया महिला काँग्रेसचे अध्यक्षपद होते. मात्र त्यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची नंतर तृणमूलने राज्यसभेवर नियुक्ती केली.
अमरिंदर सिंग
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पंजाबच्या राजकारणातील मोठे नाव आहे. त्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यांनी अगोदर स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला होता. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी हा पक्ष भाजपात विलीन केला. सध्या त्यांच्याकडे कोणतीही मोठी जबाबदारी नाही.
आर पी एन सिंह
आर पी एन सिंह हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. साधारण तीन दशके ते काँग्रेसमध्ये होते. सध्या ते उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे काम करतात.
कपिल सिब्बल
कपिल सिब्बल हे देशातील मोजक्या हुशार नेत्यांमधील एक नेते आहेत. ते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रात मंत्री होते. त्यांनी मे २०२२ मध्ये काँग्रेस पक्षाचा त्याग केला. समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर ते सध्या राज्यसभेत खासदार आहेत.
सुनिल जाखड
सुनिल जाखड हे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत सोनिया गांधी यांच्या कारभारावर टीका करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनीदेखील मे २०२२ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. सध्या ते पंजाब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
गुलाम नबी आझाद
गुलाम नबी आझाद हे काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम केलेले नेते आहेत. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वावरून मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पक्षाचा त्याग केला. काँग्रेसचा त्याग केल्यानंतर त्यांनी स्वत:चा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी नावाने पक्ष काढून जम्मू काश्मीरच्या राजकारणात उडी घेतली आहे.
जयवीर शेरगील
जयवीर शेरगील हे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. मात्र त्यांनीदेखील ऑगस्ट २०२२ मध्ये पक्षाचा त्याग करत डिसेंबर २०२२ मध्ये भाजपात प्रवेश केला. ते मूळचे जालंधरचे आहेत. सध्या भाजपाने त्यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवलेली आहे.