मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर दाखल होणार असल्याचे चर्चेवर नार्वेकर यांनी मौन सोडत ट्विटरवरून अप्रत्यक्ष उत्तर दिले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीची शिवाजी पार्क जाऊन पाहणी केल्याचे ट्विट करत आपण उद्धव ठाकरे सोबतच असल्याचे संकेत नार्वेकर यांनी दिले आहेत.
हेही वाचा… पुणे जिल्ह्यात नियोजन आराखड्यातील कामांत फेरबदल? ४०० कोटींचा निधी वळविण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आक्रमक नेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळ्यातील सभेत लवकरच मिलन नार्वेकर ही आमच्या गटात येणार असल्याचे विधान केले होते. पण त्यावर मिलिंद नार्वेकर यांच्याकडून काहीही उत्तर न आल्याने गेले दोन दिवस चर्चांना ऊत आला होता. या काळात मिलिंद नार्वेकर तिरुपतीला गेले होते. तेथील एका धार्मिक कार्यक्रमात भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत व नार्वेकर यांचे एकत्र सहभागी झाल्याचे छायाचित्रही नार्वेकर यांनी प्रसारित केले होते. मात्र गुलाबराव पाटील यांच्या विधानावर कसलेही स्पष्टीकरण दिलेले नव्हते.
आता मात्र मिलिंद नार्वेकर यांनी मौन सोडत चर्चेला पूर्णविराम दिला. रविवारी रात्री शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली आणि शेजारील बंगाल क्लबच्या दुर्गा उत्सवात जाऊन देवीचे दर्शन घेतले असे ट्विट नार्वेकर यांनी केली आहे. त्यातून आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहोत असा संदेश नार्वेकर यांनी दिला आहे.