प्रल्हाद बोरसे
मालेगाव : शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या खत विक्रेत्यास अद्दल घडविणे असो की,पोलिसांच्या कृपाशीर्वादामुळे बिनदिक्कतपणे सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर बुलडोझर चालविणे असो, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची बेधडक कार्यशैली नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. लुटीसाठी नकली बंदुकीचा धाक दाखवत एका घरात शिरलेल्या चोरट्याला पकडण्याच्या ताज्या प्रकरणात भुसे यांनी केवळ पोलिसांवर विसंबून न राहता आघाडीवर राहून बजावलेल्या भूमिकेची कौतुकमिश्रित चर्चा होत आहे.
लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू असताना शहरातील कलेक्टर पट्टा भागातील उच्चभ्रू वस्तीत एका व्यावसायिकाच्या घरात भरदुपारी एक चोरटा शिरला. घरात व्यावसायिकाची पत्नी, दोन मुली आणि घरकाम करणारी महिला अशा चौघी होत्या. बंदुकीचा धाक दाखवत पैसे, सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी चोरटा करु लागला. व्यावसायिकाच्या मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने तिचा चावा घेतला तसेच तिच्या आईलाही त्याने कात्री मारली. या प्रकाराने घरकाम करणारी महिला बाल्कनीत लपून बसली. व्यावसायिकाच्या पत्नीने स्वत:ला शयनगृहात कोंडून घेतले. घराबाहेर पळालेल्या दोन्ही मुलींनी बाहेरून दरवाजा बंद करत मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे भेदरलेल्या चोरट्याने घराच्या गच्चीचा आश्रय घेत दरवाजा बंद करून घेतला.
हेही वाचा : साताऱ्यात शंभूराजे देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली
एव्हाना बंदुकधारी चोर घरात शिरल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी जमाव जमला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रारंभी दोन्ही महिलांना सुरक्षितपणे घराबाहेर काढले. त्यानंतर संशयिताला पोलिसांना शरण येण्याचे आवाहन केले. ज्या घराच्या गच्चीत तो जाऊन बसला होता, त्या घराशेजारील बंगल्याच्या गच्चीवर जाऊन पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्याला समजाविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याला तो राजी होत नव्हता.थोड्या वेळाने पालकमंत्री दादा भुसे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही शेजारच्या गच्चीवर चढून पोलिसांना शरण यावे म्हणून चोराला समजाविण्याचे प्रयत्न सुरू केले. बाहेर आल्यावर जमावाकडून आपल्या जीवितास धोका होऊ शकतो, अशी भीती चोराने व्यक्त केल्यावर तसे मुळीच होणार नाही, असे आश्वासन भुसे यांनी दिले. अखेर चोराने शरण येण्याचे कबुल केले. त्यानुसार त्याने गच्चीचा दरवाजा उघडताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यास ताब्यात घेतले. मंत्रिपदाची कुठलीही शेखी न मिरवता थेट गर्दीत मिसळून जाणाऱ्या भुसे यांनी संशयिताने शरण यावे म्हणून त्या ठिकाणी आपली इतर नियोजित कामे सोडून बराच वेळ दिला. चोराची स्वत: झाडाझडतीही त्यांनी घेतली. अर्थात अशा प्रकारचे धाडस भुसे यांनी याआधीही दाखविले आहे.
कृषिमंत्री असताना भुसे यांनी शेतकऱ्याच्या वेशात आणि रासायनिक खते खरेदीचा बहाणा करत औरंगाबाद येथील एक दुकान गाठले होते. दुकानदार खते शिल्लक नसल्याची थाप मारत असल्याचा संशय आल्यावर स्वत:ची खरी ओळख देत शिल्लक नोंदवहीची मागणी त्यांनी केली. खते शिल्लक असताना साक्षात कृषिमंत्र्यांशी आपण लबाडी केल्याचे लक्षात आल्यावर दुकानदाराची चांगलीच पाचावर धारण बसली होती. मध्यंतरी भुसे हे मालेगाव तालुक्यातील झोडगे दौऱ्यावर गेले असता काही लोकांनी अतिक्रमण करून जुगार अड्डे सुरू केल्याची तक्रार स्थानिकांनी त्यांच्याकडे केली. तेव्हा या अतिक्रमणांवर चक्क बुलडोझर चालविण्याचे आदेश देत त्यांनी हे अवैध धंदे उद्ध्वस्त केले होते. वडनेर-खाकुर्डी येथे बाजारपट्टीलगत बिनदिक्कतपणे जुगार अड्डा सुरू असल्याचे त्यांच्या नजरेने असेच एकदा हेरले. या अड्डयावर छापा टाकत जुगारी आणि अवैध धंद्यात गुंतलेल्या लोकांना पकडून त्यांनी पोलिसांच्या हवाली केले होते. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा अड्डा कसा काय सुरू राहू शकतो, असा जाब भुसे यांनी विचारल्याने पोलिसांची तेव्हा चांगलीच भंबेरी उडाली होती.