ठाणे : डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकविणाऱ्या भाजप नेत्यांनी अखेर कल्याण शिंदेचेच राहील अशी भूमीका घेत दिलजमाईची भूमीका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापाठोपाठ सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. कल्याणविषयी मवाळ भूमीका घेणाऱ्या भाजप नेत्यांनी ठाण्याविषयी मात्र सूचक मौन धारण केल्याने मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाईल याविषयी संभ्रम कायम राहीला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी नाशीकच्या दौऱ्यावर असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशीक आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघाविषयी भाष्य करताना या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार असतील हे स्पष्ट केले. बावनकुळे यांच्यापाठोपाठ सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीतील भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनीही कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे पहिल्या पसंतीचे उमेदवार असल्याचे सांगत त्यांच्या विजयासाठी भाजप पूर्ण जोमाने काम करेल असे वक्तव्य केले. काही महिन्यांपूर्वी डोंबिवली पूर्व भागातील भाजपचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील संबंध ताणले गेले होते. डोंबिवलीत एक बैठक घेत शिंदे पिता-पुत्रांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची भूमीकाही भाजपने घेतली होती. काहीही झाले तरी खासदार शिंदे यांना सहकार्य करायचे नाही अशी जाहीर भूमीका घेत भाजपचे पदाधिकारी कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगू लागले होते. ठाण्यातही भाजपने येथील लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्याने स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटातील तणाव वाढला होता. गेल्या काही दिवसांपासून मात्र हा तणाव निवळू लागल्याचे चित्र असून डोंबिवलीत रविंद्र चव्हाण यांच्याशी जुळवून घेण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु झाल्याचे वृत्त आहे. चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात निधी देणे, चव्हाण यांना अपेक्षीत असलेली रस्त्यांची कामे मार्गी लावणे असे काही निर्णय नगरविकास विभागाने मध्यंतरी घेतले आहेत. त्यामुळे चव्हाणही कधी नव्हे ते आम्हाला श्रीकांत शिंदे हेच खासदार हवेत असे बोलू लागले आहेत.

हेही वाचा – गहलोत-पायलट यांच्यात दिलजमाई; पण कार्यकर्त्यांमध्ये मनभेद कायम, काँग्रेससमोर आव्हान

ठाण्याचा संभ्रम कायम

बावनकुळे, चव्हाण यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाविषयी भूमीका स्पष्ट केली असली तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाविषयी मात्र अजूनही संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे. ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असेल याविषयी स्पष्टता नाही. माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे नवी मुंबईतील नेते विजय नहाटा अशी काही नावे यासाठी अधूनमधून चर्चेत आणली जात असली तरी भाजप नेत्यांची तयारी या मतदारसंघात अधिक दिसते. गेल्या काही महिन्यांपासून भाजपने लोकसभा संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील सर्वच विधानसभा क्षेत्रात दौरे वाढविले असून यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवी मुंबईतील पक्षाचे नेते संजीव नाईक यांनी यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यातील मंडळांना केलेली रसद पेरणीही चर्चेत आहे. याशिवाय ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांची लोकसभा पाठवणीची चर्चा जोरात असून या पार्श्वभूमीवर शिंदे गटात मात्र या आघाडीवर शुकशुकाट दिसू लागला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये शिंदे गटाचा मार्ग मोकळा करून देताना ठाण्याचा बालेकिल्ला हिसकावून घेण्याची रणनिती भाजप गोटात आखली जात असल्याच्या चर्चेला बळ मिळू लागले आहे.

हेही वाचा – पुरानंतर नागपुरात पक्षीय राजकारण जोरात

कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षे श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. यापुढील काळातही शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील आणि आम्ही त्यांच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न करू. – रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित असून ठाणे लोकसभा कुणी लढवायची याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे करतील. – शंभुराज देसाई, पालकमंत्री ठाणे

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister ravindra chavan announced shrikant shinde will be candidate of the grand alliance from kalyan lok sabha constituency but bjp leaders silent about thane print politics news ssb
Show comments