विश्वास पवार
सातारा: राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून, एकमेकांवर आरोपांच्या, टीकेच्या फैरी झडू लागल्या आहेत. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यात आरोपांचा सामना आता रंगू लागला आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना आणि शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री असतानाही साताऱ्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्व वाढणार नाही, याची पुरेपूर काळजी रामराजे व राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. याचा वचपा काढण्यास देसाई यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे साताऱ्यात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढाई जुंपली आहे.
रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील जेष्ठ नेते आहेत. फलटणच्या कार्यक्रमात रामराजेंनी विरोधकांमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार खंडित करण्याचे सुरू असलेले प्रकार पाहिल्यानंतर दुःख वाटते. मात्र, पुन्हा नव्याने मोट बांधून राष्ट्रवादीचा स्वाभिमान उभा करू आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या विधानसभेतील पराभवाचा वचपा काढू, असेही वक्तव्य केले होते. कोरेगाव मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केल्यानंतर शंभूराजे देसाई यांनी रामराजे यांना लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजून पंधरा वर्षे सत्तेत येऊ शकणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील आणि मेहबूब शेख यांनी शंभूराजे देसाई यांचा आगामी निवडणुकीत विजय शिवतारे होईल, असे वक्तव्य केले. पुढील विधानसभेला पाटणची परिस्थिती शंभूराजे यांना समजेल, राज्यातील सरकार निष्क्रिय असल्याची टीकाही राष्ट्रवादीकडून करण्यात येऊ लागली आहे.
हेही वाचा : गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी ९०० अधिकाऱ्यांच्या बदल्या; निवडणूक आयोगाने का घेतला निर्णय?
रामराजे निंबाळकर यांना साताऱ्याचे राजकारण चांगलेच माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा रोख पाटण आणि कोरेगाव मतदार संघाकडे असतो. देसाई हेदेखील संधी मिळेल तेथे राष्ट्रवादी काँग्रेसवर टोकाची टीका करत आहेत. यापुढील राजकारणात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून देसाई यांना घेरण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी राहणार आहे. हे लक्षात आल्यामुळेच देसाई अशी टीका करत असून त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
हेही वाचा : विदर्भात खरीप हंगामातील ६० टक्के पीक अतिवृष्टीने उद्ध्वस्त
आतापर्यंत साताऱ्याची सर्व राजकीय सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून या पक्षाकडे राहिली आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना व शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री असतानाही साताऱ्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्व वाढणार नाही, याची पुरेपूर काळजी रामराजे व राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडीत खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना बरोबर घेऊन देसाईंना डावलले गेले. त्याचा वचपा काढण्यास देसाई यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढील काळात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणात जिल्ह्यावरील पकड ढिली होऊ नये, या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र रंगणार आहे.