यंदाच्या जत्रंत कुस्ती करायचीच, अन् कुठल्याही स्थितीत नावाजलेल्या पैलवानाला आस्मान दाखवायचंच असं ठरवून गावातील अर्धा डझन पैलवान गावच्या ओढ्यात घाम गाळत होती. घाम गाळता, गाळता चर्चाही करायची, सगळ्यांचा खुराक विभागून गेला तर एकाच पैलवानाची तब्बेत सुधारणार कशी असा रास्त सवाल एकमेकाला विचारत होती, मात्र, माघार कुणी घ्यायची यावर एकमत काही केल्या होईना झाले होते. वस्ताद मंडळी तुझीच जोड लावणार अस शपथेवर सांगत असल्याने माघार घ्यायची कुणाचीच तयारी नव्हती. जत्रंचा फड काही दिवसावर आल्या, हालगी वाजू लागली. तुतारींचा आवाज मैदानात घुमू लागला आणि अचानकपणे नावाजलेल्या पैलवानाचा पठ्ठ्याच मैदानात उतरून जोर बैठका काढत आवाज घुमवू लागला तसा हालगीबरोबरच घुमकीनेही ठेका धरला. आतापर्यंतची अर्धा डझन पैलवानांची ओढ्यात केलेली मेहनत वाया जाते की कुस्तीच नुरा होते याकडे जत्रेकरूंचे आता लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा