अतुल सावे
तसे मितभाषी. नेत्यांनी सांगितलेली प्रत्येक बाब जशास तशी अंमलात आणणारे म्हणून प्रसिद्ध. आपल्या भागात उद्योगातून प्रगती होऊ शकते हे ओळखून आपली सारी शक्ती त्यासाठी खर्ची पाडणारे नेते अशी अतुल सावे यांची ओळख. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संजय कनेकर की अतुल सावे या पेचात अतुल सावे यांना यांना उमेदवारी मिळाली आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघावर त्यांनी पकड मजबूत केली. अल्पसंख्याक मतदारांची संख्या अधिक असणाऱ्या या मतदारसंघात अतुल सावे यांनी २०२४ मध्ये पुन्हा यश मिळवले. इत्तियाज जलील यांना पराभूत करुन आलेल्या अतुल सावे यांचा विजय ‘ एक है तो सेफ है’ या घोषणेशी जोडला गेल्याने त्यांना पुन्हा मंत्री पद मिळेल अशी आशा होती. सहकार आणि बहुजन कल्याण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे अतुल सावे यांनी संभाजीनगरमध्ये उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांचे मंत्रिमंडळात असणे मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या अखेरच्या काळात उद्योग राज्यमंत्रीरपद त्यांनी भूषविले.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम सहकार विभागाचे मंत्री होते. पुढे त्यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रालयाची जबाबदारी आली. याच काळात बहुजन कल्याण मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांचे वडिल मोरेश्वर सावे हे खासदार व महापौर होते.
आणखी वाचा-महिलांसाठीच्या योजनेमुळे ओडिशात भाजपा – बीजेडीमध्ये का वाद होतोय?
संजय शिरसाट
संभाजीनगर शहरातील वेदांतनगर भागातून महापालिकेच्या राजकारणातून सुरुवात करत संजय शिरसाट यांनी सुरुवात केली. २००९ ते २०२४ मधील चार वेळा येण्यापूर्वी संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयात स्वत: साठी एक विमानाच्या आकाराचे दालन बनवले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि संजय शिरसाट मंत्री होतील असे मानले जात होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र, मंत्री पदाची खूर्ची त्यांना मिळत नव्हती. आता ती मळाली तेव्हा सहाजिकच प्रतिक्रिया होती- शिरसाट यांचे विमान उडाले. संजय शिरसाट यांना मंत्रीपद मिळेल असा गेल्या तीन वर्षातील कार्यकर्ते करत असणारा दावा आता प्रत्यक्षात उतरणार आहे. शिवसेनेचे प्रवक्तेपण सांभाळणारे संजय शिरसाट मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची बाजू लावून धरण्याचे काम केले. त्याच वेळी भाजपमधील नेत्यांशीही ते समन्वय ठेवून होते. शिवसेनेतून मराठवाड्यातील ते एकमेव मंत्री आहेत.
आणखी वाचा-गणेश नाईकांचा मंत्रिमंडळात समावेश करून भाजपाचे शिंदेंना आव्हान?
बाबासाहेब पाटील
लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले मंत्री संजय बनसोडे यांच्याऐवजी आता अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळाले. आमदार बाबासाहेब पाटील यांनी तिरंगी लढतीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले आहेत . २००९ मध्ये त्यांनी रिडालोसच्या माध्यमातून ते निवडून आले होते .लातूर जिल्हा बँकेचे ते उपाध्यक्ष राहिले आहेत. यापूर्वी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब जाधव, किसनराव देशमुख व विनायकराव पाटील या तिघांना राज्यमंत्रीपद मिळाले होते. बाबासाहेब पाटील हे उत्कृष्ट खेळाडू आहेत माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांचे ते पुतणे आहेत. बाळासाहेबांनी आपला राजकीय वारसा बाबासाहेब पाटलांकडे सुपूर्द केला व त्यांनी यशस्वीपणे आपली कारकीर्द सुरू ठेवली आहे.