दादाजी भुसे- शिवसेना (एकनाथ शिंदे)
- कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पाटबंधारे खात्यातील नोकरी सोडून राजकारणात. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख. शिवसेनेला २००४ मध्ये सोडचिठ्ठी देऊन तत्कालीन दाभाडी मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजय. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन मालेगाव बाह्य मतदार संघातून सातत्याने विजयी. एकूण पाचवेळा आमदार. शिवसेनेतील विभाजनानंतर एकनाथ शिंदे यांना साथ.
- सहकार, ग्रामविकास राज्यमंत्रिपदानंतर कृषी व माजी सैनिक कल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी योजना व फलोत्पादन खात्यांची मंत्रिपदे भूषविली आहेत.
- एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, सर्वपक्षीयांशी जुळवून घेणारे आणि वादापासून अलिप्तता.
गुलाबराव पाटील- शिवसेना (एकनाथ शिंदे )
- जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या पाळधी ग्रामपंचायतीपासून राजकारणाची सुरुवात. १९९९ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून एरंडोल विधानसभा मतदारसंघात उमेदवारी आणि विजय. २००९ चा अपवाद वगळता जळगाव ग्रामीणमधून सातत्याने विजयी. २०२२ मध्ये शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ.
- २०१६ मध्ये सहकार राज्यमंत्री. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री. २०२२ मध्ये महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री.
- विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) सर्व पाच जागा निवडून आणण्यात महत्वाची भूमिका आणि पक्षातील ज्येष्ठत्व
आणखी वाचा-मंत्र्यांची ओळख : अतुल सावे, संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील
गिरीश महाजन- भाजप
- १९९२ मध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीस सुरुवात. १९९५ मध्ये पहिल्यांदा जामनेर मतदारसंघातून विजय. २०२४ च्या निवडणुकीत जामनेरमधून सातव्यांदा विजय.
- २०१४ मध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री. २०१६ मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री, २०२२ मध्ये ग्रामविकास व पर्यटन मंत्री.
- २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवून देण्यात मोठा वाटा. पक्षाचे निष्ठावंत आणि पक्षाला संकटातून बाहेर काढण्यात तरबेज. भाजपमध्ये संकटमोचक म्हणून ओळख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय.