भाईंदर :- मिरा भाईंदरमध्ये  नरेद्र मेहता आणि गीता जैन या आजी माजी आमदारांमध्ये महायुतीच्या उमेदवारीवरून जोरदार जुंपली असून , उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची उभयतांनी तयारी केली आहे. 

मीरा भाईंदर हा मतदारसंघ कमालीचा चुरशीचा बनला आहे. येथे गीता जैन या अपक्ष आमदार असून त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. आता महायुतीतर्फे आमदार गीता जैन पुन्हा प्रयत्नशील असून माजी आमदार नरेंद्र मेहता पुन्हा सर्व ताकदीनीशी तिकिट मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच माजी जिल्हाध्यक्ष रवि व्यास यांनी रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे स्पर्धा वाढली आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांनी महायुतीला समर्थन दिल्यामुळे यंदाही आपल्यालाच तिकीट मिळणार असल्याचा त्यांचा दावा आहे.

हेही वाचा >>>आपटीबार : हल्ला पुरे!

मात्र प्रत्यक्षात मिरा भाईंदरच्या जागेवरून स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.यात दोन्ही नेते हे आमदार गीता जैन यांना आपल्या पक्षातून उमेदवारी देण्यासाठी खटपट करत असल्याचे समजले आहे.या बातमीमुळे मेहता गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमार्फत मेहता हे जैन यांचा सातत्याने विरोध करत आहेत.परंतु उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा तिसरा दिवस उलटल्यानंतरही अजूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.त्यामुळे जैन आणि मेहता समर्थकांमध्ये तिकिटावरून संभ्रम निर्माण झाला असून भयभीत शांतता पसरली आहे.तर राजकीय कार्यक्रम व जन संवाद देखील थंडवला असल्यामुळे शहरात राजकीय शांतता पसरल्याचे चित्र उभे राहिले आहे.

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला असून येथून काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष मुजफर हुसेन हे लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.