Mithun Chakraborty Hate Remarks: बॉलीवूड अभिनेते व आता भाजपाचे नेते असलेले मिथुन चक्रवर्ती सध्या त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. १३ नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगाल विधानसभेच्या सहा मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. २७ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे भाजपा सदस्य नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही त्यावेळी विशेष उपस्थिती होती. यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या वक्तव्यातून अल्पसंख्याकांना धमकीवजा इशारा दिला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमाला अमित शाह यांच्याबरोबरीने विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजूमदार उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिताई, मदारीहाट, नैहाती, हरोआ, मेदीनीपूर व तालडांगरा या सहा विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होणार आहे. २०२१ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने यातील पाच ठिकाणी विजय मिळविला होता आणि मदारीहाट विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता.

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना नुकतेच केंद्र सरकारने दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले होते. भाजपा सदस्य नोंदणी कार्यक्रमात बोलताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “२०२६ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आम्हालाच मिळणार आहे आणि सत्ता मिळविण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, काहीही. मी हे केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर बोलत आहे. काहीही, या शब्दात बराच काही अर्थ दडला आहे.”

तुम्हाला कापून गाडून टाकू

मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या आक्रमक विधानामागे तृणमूल काँग्रेसच्या हुमायू कबीर यांच्या जुन्या वक्तव्याचा राग होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कबीर यांनी एक वादग्रस्त विधान केले होते आणि त्यावरून निवडणूक आयोगाने कारवाईही केली होती. त्यावेळी कबीर म्हटले होते की, मी तुम्हाला भागीरथी नदीमध्ये फेकून देईल. तुम्ही फक्त ३० टक्के आणि आम्ही ७० टक्के आहोत. तुम्ही मशीद तोडत असताना मुसलमान घरात शांतपणे बसून राहतील, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चूक करताय,” असे म्हटले होते.

कबीर यांच्या विधानाचा हवाला देऊन मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “ते सांगतात की, त्यांची लोकसंख्या ७० टक्के आणि आमची लोकसंख्या ३० टक्के आहे. तुम्ही आम्हाला कापून भागीरथीमध्ये फेकणार असाल; पण आम्ही तुम्हाला कापून भागीरथीमध्ये नाही टाकणार. कारण- नदी आमची माता आहे; पण आम्ही तुम्हाला तुमच्या जमिनीवर फेकून देऊ.”

तृणमूल काँग्रेसला इशारा देताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “आम्हाला लढाऊ कार्यकर्ते हवे आहेत; जे आव्हान देऊ शकतात. जर तुम्ही (विरोधक) आमच्या झाडाचे एक फळ तोडणार असाल, तर आम्ही तुमच्या झाडावरील चार फळे तोडून टाकू.”

तृणमूल काँग्रेसकडून टीका

तृणमूलचे उपाध्यक्ष जय प्रकाश मजूमदार म्हणाले की, चक्रवर्ती हे अपरिपक्व राजकीय व्यक्ती असल्याचे त्यांच्या विधानावरून कळते. अभिनेते असलेले चक्रवर्ती व नेते असलेले चक्रवर्ती यांच्यात बराच फरक आहे. राजकीय मंचावर ते दुसऱ्या कुणाची तरी स्क्रिप्ट वाचत असल्याचे दिसत आहे. ते जे बोलले, ते निषेधार्ह आहे. भाजपाने चक्रवर्ती यांच्या विधानावर खुलासा करावा.

हुमायूँ कबीर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीला मी जे विधान केले होते, ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर देताना केले होते. पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या हिंसाचारानंतर शांतता नांदत असताना योगी आदित्यनाथ यांच्या विधानांमुळे तणाव आणखी वाढत चालला होता. कबीर पुढे म्हणाले की, मी जे काही बोललो त्यामुळे भाजपाचे लोक मला लक्ष्य करीत आहेत. मी त्या विधानाबद्दल माफीही मागितली. तरीही इतक्या महिन्यानंतर आता भाजपाचे नेते त्याच जुन्या विधानाचा हवाला देऊन राजकीय पोळी भाजून घेत आहेत. त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, मलाही बोलता येते. जर त्यांना बोलताना काही वाटत नसेल, तर मीही बोलायला कचरणार नाही. माझ्या लोकांचे रक्षण करण्यासाठी जे करावे लागेल, ते मी करेन.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithun chakraborty hate remarks in front of amit shah create a stir in bypoll bound bengal kvg