केंद्रीय निवडणूक आयोगाने मिझोरम राज्यासह इतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. मिझोरम राज्यात चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, मिझोरम विधानसभेचे माजी अध्यक्ष लालरिन्लियाना सायलो यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मिझो नॅशनल फ्रंटने (एएनएफ) तिकीट नाकारल्यामुळे सायलो यांनी हा निर्णय घेतला. मिझोरममध्ये विकास करायचा असेल, तर केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असणे गरजेचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपापुरस्कृत एनडीएचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. भाजपा देशाच्या विकासासाठी चांगले प्रयत्न करीत आहे. याच कारणांमुळे मी भाजपात प्रवेश केला आहे, असे स्पष्टीकरण सायलो यांनी दिले आहे.
“विकासासाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळणे गरजेचे”
भाजपात प्रवेश केल्यानंतर सायलो यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाचे काम, मिझोरमचा विकास, भाजपाची सध्याची मिझोरममधील स्थिती यावर भाष्य केले. मिझोरमचा विकास करावयाचा असेल, तर केंद्राकडून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. याच कारणामुळे मी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे सायलो यांनी सांगितले. मिझोरम राज्यात ख्रिश्चन समाज बहुसंख्य आहे. या राज्यात विकासाचा अजेंडा हा इतर सर्व अडचणींवर मात करील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला?
“मिझोरम राज्यावरील आर्थिक ताण आणि इतर संकटं लक्षात घेता, केंद्राडून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. तसेच २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. याच कारणामुळे मी भाजपात प्रवेश केला. सध्या भाजपाचे येथे तुलनेने कमी अस्तित्व असले तरी भविष्यात आमच्या पक्षाचा विस्तार होईल. मणिपूरमधील घटनांमुळे मिझोरममध्ये भाजपाचा विस्तार होणे कठीण आहे, असे म्हटले जात होते; मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. मणिपूरमधील वांशिक संघर्षाबद्दल लोकांना कल्पना आली आहे. सध्या येथे पक्षाचा जनाधार वाढत आहे,” अशी प्रतिक्रिया सायलो यांनी दिली.
“मणिपूरमधील संघर्ष हा वांशिक स्वरूपाचा”
मणिपपरूमधील हिंसाचारानंतर मिझोरममध्ये भाजपाच्या विस्ताराला खीळ बसेल, असा दावा केला जात होता. काही दिवसांपूर्वी मणिपूर भाजपाच्या उपाध्यक्षांनी भाजपावर टीका करीत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मणिपूरमधील भाजपा सरकार आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्याने चर्च पाडण्यात आली, असा दावा त्यांनी केला होता. याबाबत विचारले असता, सध्या परिस्थिती बदलली आहे. लोकांना मणिपूरमधील खऱ्या परिस्थितीची कल्पना आलेली आहे. ही हिंदू किंवा भाजपामुळे निर्माण झालेली स्थिती नाही. मणिपूरमधील संघर्ष हा वांशिक स्वरूपाचा आहे. मणिपूरमधील नेमकी परिस्थिती आता लोकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे आगामी काळात मिझोरम राज्यात भाजपाचा जनाधार वाढेल, असे सायलो म्हणाले.
“भाजपाच्या विचारधारेबाबत लोकांमध्ये गैरसमज”
मिझोरम राज्यात ख्रिश्चन धर्मीय मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन भाजपाचा प्रचार-प्रसार कसा होणार, असा प्रश्न सायलो यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना “सध्या मिझोरम राज्यात हिंदुत्व आणि भाजपा पक्षाची विचारधारा याबाबत लोकांमध्ये गैरसमज आहे. मात्र, देशाच्या विकासासाठी एनडीएने केलेले काम येथील लोकांना समजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्कृष्ट काम करतात. त्यांची कामगिरी खूप चांगली आहे,” असे सायलो म्हणाले.
“मिझोरममध्ये पक्षाचा विस्तार होईल, अशी भाजपाला आशा”
दरम्यान, मिझोरममध्ये सरकार स्थापन करायचे असल्यास भाजपाची मदत लागणारच आहे. येथे कोणताही एक पक्ष बहुमतात येऊन सत्ता स्थापन करू शकत नाही, असे प्रतिपादन सायलो यांनी केले. सध्या तरुणांना विकास हवा आहे. केंद्राचा पाठिंबा आणि सहकार्याशिवाय मिझोरममध्ये विकास करणे कठीण आहे. राज्याचा विकास करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नाही. भाजपाने देशात खूप विकासकामे केली आहेत, हे तरुणांना समजले आहे. याच कारणामुळे मिझोरम राज्यात भाजपाचा विस्तार होईल, अशी भाजपाला आशा आहे, असेही सायलो यांनी स्पष्ट केले.