मोहन अटाळकर
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित नियमबाह्य गुंतवणुकीच्या मुद्यावर गेल्या वर्षी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत रान उठवण्यात आले, तोच विषय पुन्हा उकरून काढत आमदार बच्चू कडू यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर शरसंधान केल्याने अमरावतीत राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
२०१७ ते २० या वर्षांत बँकेने म्युच्युअल फंडात जवळपास अकराशे कोटीची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक थेट म्हणजेच कोणत्याही एजंटशिवाय करण्याचा ठराव झाला होता. या वर्षांमध्ये पाच एजंट बँकेमार्फत काम पाहत होते. त्या एजंटांना एकत्रित ३.४२ कोटी रुपयांचे कमिशनही देण्यात आले, ते कमिशन कोणाला मिळाले याची चौकशी झाली पाहिजे, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून सहकार कायद्याअंतर्गत कलम ८८ अन्वये कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांचा रोख बबलू देशमुख यांच्यावर आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बच्चू कडू यांनी घेतलेला हा पवित्रा आश्चर्यकारक नसला, तरी बच्चू कडू यांच्या राजकारणाच्या बदलत्या प्रवाहाचा निदर्शक ठरला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
हेही वाचा: राहुल पंडित : रत्नागिरीच्या राजकारणातला सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा
बँकेच्या संचालक मंडळावर ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा एका मतदार संघात पराभव करून निवडून आले खरे, पण त्यांच्या नेतृत्वातील पॅनेलला फारसे यश मिळू शकले नव्हते. दुसरीकडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील पॅनेलने पुन्हा एकदा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. बबलू देशमुख हे दुसऱ्या मतदार संघातून निवडूनही आले होते. त्यावेळी कथित नियमबाह्य गुंतवणुकीच्या मुद्यावर रान उठवण्यात आले होते. सत्तारूढ आघाडीतील दोन मंत्र्यांमधील ही लढाई त्यावेळी चर्चेतही आली होती. पण, त्याचा परिणाम निकालावर जाणवला नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. बच्चू कडू हे सत्तारूढ गटात सामील झाले आहेत. बँकेत कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांची सत्ता आहे. कॉंग्रेसच्या कार्यक्रमांसाठी बँकेचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यामुळे बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू आणि बबलू देशमुख यांच्यातील या संघर्षाला दुसरी राजकीय किनार देखील आहे.
बबलू देशमुख हे बच्चू कडू यांचे अचलपूर मतदार संघातील प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंनी बबलू देशमुख यांचा सुमारे ८ हजारांवर मतांनी पराभव केला होता. त्याआधीच्या निवडणुकीतही हे दोन नेते आमने-सामने होते. बँकेतील गुंतवणुकीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने स्थगनादेश दिला असला, तरी चौकशी थांबवलेली नाही. त्यामुळे कलम ८८ अंतर्गत कारवाईसाठी आपण पाठपुरावा करू, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. ही आगामी निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे. मैदानात उतरण्यापुर्वी विरोधकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तूळात उमटली आहे.