मोहन अटाळकर
अमरावती : आमदार बच्‍चू कडू हे सत्‍तारूढ आघाडीत असले, तरी अनेकवेळा सरकारवर टीका करीत आहेत. आमदार रवी राणा आणि त्‍यांच्‍यातील वितुष्‍ट सर्वश्रुत आहे. आता त्‍यांनी आपल्‍याला काँग्रेसपेक्षा भाजपचा सर्वाधिक त्रास असल्‍याचे स्‍पष्‍टपणे सांगून सरकारमध्‍ये सर्वकाही आलबेल नाही, असेच संकेत दि‍ले आहेत. बच्‍चू कडू यांच्‍या अस्‍वस्‍थतेची चर्चा आता रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अचलपूर मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आलेल्‍या बच्‍चू कडू यांचा राजकीय प्रवास हा स्‍वतंत्ररीत्‍या झाला आहे. सत्‍तेच्‍या विरोधातील भूमिकेचा त्‍यांचा प्रवास महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात संपला आणि त्‍यांना राज्‍यमंत्रिपद देखील मिळाले. पण, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्‍यानंतर त्‍यांनी शिंदेंना पाठिंबा देऊन सत्‍तेसोबत राहण्‍याचा निर्णय घेतला. ‘खोक्‍यां’च्‍या आरोपांमुळे ते अनेकवेळा अस्‍वस्‍थ झालेले दिसले. शिंदे सरकारमध्‍ये मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा त्‍यांना होती, पण ती पूर्ण झाली नाही. दिव्यांग कल्‍याण विभागाचे अध्‍यक्षपद देऊन त्‍यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्‍यात आला खरा, तरीही ते समाधानी नसल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

हेही वाचा >>> परभणीत पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे शिंदे गटाला मोठा धक्का

अमरावती जिल्‍ह्यातील राजकारणावर पकड अधिक घट्ट करण्‍याचे बच्‍चू कडू यांचे प्रयत्‍न आहेत. सोबतच दिव्‍यांगांच्‍या प्रश्‍नावर राज्‍यभर फिरून प्रहार जनशक्‍ती पक्षाचे जाळे विस्‍तृत करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या हालचाली लपून राहिलेल्‍या नाहीत. बच्‍चू कडू यांचे जिल्‍ह्यातील विरोधक रवी राणा यांचा प्रवास वेगळा आहे. काँग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आलेल्‍या राणा दाम्‍पत्‍याने राज्‍यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्‍या सरकारला पाठिंबा दिला. रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांच्‍या निकटचे मानले जातात. फडणवीस हे जिल्‍ह्याचे पालकमंत्री आहेत. बच्‍चू कडू आणि रवी राणा हे दोघेही सत्‍तारूढ महायुतीचे घटक आहेत. पण, रवी राणांना झुकते माप मिळत असल्‍याची प्रहारच्‍या कार्यकर्त्‍यांची खंत आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूरातील साखर कारखान्यांसमोर कर्जाचा डोंगर; हंगाम सुरु करताना राजकीय नेतृत्वाचा कस

रवी राणा यांनी बच्‍चू कडू यांच्‍या मतदार संघात परतवाडा येथे दहीह‍ंडीच्‍या कार्यक्रमात कडूंवर थेट टीका करण्‍याचे टाळले, पण दोघांमध्‍ये दरी आहेच. अंजनगावातील दहीहंडीच्‍या कार्यक्रमानंतर रवी राणा आणि शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे महेंद्र दिपटे यांच्‍यात वाद झाला होता. हाणामारीपर्यंत हे प्रकरण पोहचले होते. बच्चू कडू हे जुने शिवसैनिक आहेत. नव्वदच्या काळात शिवसेना उभारीला येत असताना महेंद्र दिपटे व बच्चू कडू हे अनेक आंदोलनात सोबत असायचे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये ‘खोके’ घेतल्याच्या आरोपांवरून चांगलाच वाद रंगला होता. हा वाद मिटवण्यासाठी शिंदे-फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांनी नमती भूमिका घेत विषयाला विराम दिला होता. पण, आता बच्चू कडू यांनी महेंद्र दिपटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या घटनेने राजकीय वर्तुळात वेगळा संदेश गेला.

हेही वाचा >>> अजित पवारांच्या मनासारखे झाले; छगन भुजबळ, आदिती तटकरे यांच्यासाठी प्रतीक्षा

गेल्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकच जागा मिळू शकली, हे पक्षाचे मोठे शल्‍य आहे. पक्षबांधणीसोबतच अधिकाधिक जागा मिळविण्‍याचे प्रयत्‍न भाजपकडून केले जात आहेत. या निवडणुकीत अचलपूरमध्‍ये प्रहार आणि काँग्रेसमध्‍ये थेट लढत झाली होती. युतीत ही जागा शिवसेनेकडे असताना या पक्षाला चांगली कामगिरी करता आली नव्‍हती. २०१४ च्‍या निवडणुकीच्‍या वेळी युती आणि आघाडी नसताना बच्‍चू कडू यांना भाजपचे त्‍यावेळचे उमेदवार अशोक बन्‍सोड यांनी कडवी झुंज दिली होती. आगामी निवडणुकीतही बच्‍चू कडू यांचा संघर्ष भाजपसोबत होईल, असे संकेत आहेत. सत्‍तेत भाजप सोबत असताना त्‍यांनी मैत्रीचा धर्म पाळावा, अशी बच्‍चू कडूंची अपेक्षा असली, तरी अधिकाधिक जागा मिळवण्‍याचे लक्ष्‍य समोर ठेवणाऱ्या भाजपने बच्‍चू कडू यांनी कोंडी करण्‍याचे प्रयत्‍न चालवले आहेत.

सध्‍या भाजपकडे राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे, पाठिंबा देणाऱ्या खासदार नवनीत राणा, विधान परिषद सदस्‍य आणि शहराध्‍यक्ष प्रवीण पोटे, दुसरे विधान परिषद सदस्‍य श्रीकांत भारतीय, धामणगावचे आमदार प्रताप अडसड या सारख्‍या महत्‍वाच्‍या पदावरील नेत्‍यांचे बळ आहे. भाजपची पक्षविस्‍ताराची महत्‍वाकांक्षा ही बच्‍चू कडू यांच्‍या मार्गातील अडसर बनू पाहत असल्‍याने त्‍यांनी आता भाजपकडून सर्वाधिक त्रास असल्‍याची खदखद बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजप आणि बच्‍चू कडू यांच्‍यातील दरी रुंदावणार ही कमी होणार, हा औत्‍सुक्‍याचा विषय बनला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bachchu kadu is restless due to bjp politics print politics news ysh
Show comments