सौरभ कुलश्रेष्ठ
मुंबई : विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडल्यानंतर वातावरण तणावपूर्ण असताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या हिंदीमधील प्रतिक्रियेची चर्चा विधान भवनात रंगली. विरोधी आमदारांनी धक्काबुक्की केल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ”अरे हाड वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे हमने उनको धक्काबुक्की किया” असे विधान गोगावले यांनी वाहिन्यांच्या कॅमेरासमोर केल्यानंतर तणावाच्या वातावरणात हास्याची लकेर पसरली.
हेही वाचा… शिंदे गटातील आमदार, खासदार कमळावर लढणार?
विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक घोषणाबाजी देताना आमने सामने आले आणि त्यातून शाब्दिक बचाबाची होऊन त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यानंतर या प्रसंगाबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींना भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही तुम्ही आमच्या अंगावर येऊ नका. आमचा नाद करायचा नाही असा इशारा भरत गोगावले यांनी विरोधी आमदारांना दिला.
हेही वाचा… मिरजेत शिवसेना फुटीतील वाद गणेशोत्सवाच्या स्वागत कमानीपर्यंत
भरत गोगावले यांनी मराठीतून प्रतिक्रिया दिल्यानंतर हिंदी वाहिन्यांच्या पत्रकारांनी हिंदीमधून प्रतिक्रिया देण्याचा आग्रह गोगावले यांच्याकडे धरला. त्यावर ” ये तो अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है,” असा इशारा गोगावले यांनी दिला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्ताधारी आमदारांना धक्काबुक्की केली का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, “अरे हाड वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे हमने उनको धक्काबुक्की किया” अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी देताच उपस्थितांमध्ये हशा उसळला.