लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणजे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्याचा परवाना मिळाला असे समजतात की काय हे मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार. बरळणे हा तसा अशा नवशिक्यांचा छंद. म्हणून काय काहीही बरळायचे. घरातली देखणी मुलगी सरकारी बाबूंना, काळीसावळी व्यावसायिकाला आणि राहिलेला गाळ शेतकऱ्यांच्या पोराला, अशा रीतीने लग्नाची क्रमवारी ठरल्याने शेतकऱ्यांना घरात ‘हेंबड, हांबड’ मुले जन्म घेतात हे या भुयारांचे उद्गार. आपलाही जन्म शेतकऱ्यांच्या पोटी झालेला याचा जणू विसरच पडलेला दिसतो या आमदारांना. हे महायश अजितदादांच्या गोटात सध्या स्थिरावलेले. मागच्या पराभवापासून खुद्द दादाच जीभ चावून बोलत असताना यांची मात्र सैल सुटलेली दिसते. गेल्या वेळी यांनी सध्या आधुनिक धर्मकारणाचे उद्धारकर्ते झालेल्या अनिल बोेंडेंचा पराभव केला. नंतर बोंडेंची अचानक लॉटरी लागली व त्यांच्या भाषेला धरबंदच उरला नाही. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हे कधीकाळी शेतकरी नेता असलेले भुयार निघालेले दिसतात.
हेही वाचा : Haryana Exit Poll: सत्ता टप्प्यात दिसताच काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच; पद एक, दावेदार अनेक
शेतकऱ्यांची अवस्था वाईट. त्यामुळे त्यांच्या मुलांची लग्ने जुळत नाहीत हे खरे पण ही अवस्था दूर करण्यासाठी या भुयारांनी गेल्या पाच वर्षांत केले काय तर काहीच नाही. हे अपयश झाकण्यासाठी अशा अपशब्दांचा आधार घेतला म्हणजे निवडून येऊ असे यांना वाटते की काय? कृती शून्य आणि बोलबच्चनगिरीच जास्त असा यांचा प्रवास. तोही आता अंतिम टप्प्यावर आलेला. त्यातून काही बोध घेण्याऐवजी हे निघाले मुलींची वर्गवारी करायला. यावरून गदारोळ उठल्यावर दादांनी झापले म्हणे यांना. तरीही क्षमा मागायला तयार नाहीत ते. सत्तेचा माजच म्हणायचा हा. पराभवाच्या भीतीने गारठलेले दादा सुधारले, पण त्यांच्या या असल्या समर्थकांचे काय? ते कधी दुरुस्त होणार? येत्या निवडणुकीत जबर आपटी खाल्ल्यावर की त्याआधी? घर फिरले की घराचे वासेही फिरतात म्हणे!
हे भुयार त्याच मार्गाने चाललेले!
श्री. फ. टाके