‘सहकार मंत्री अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे यांच्याबरोबर काम करत होतो. तेव्हा अतुल सावे राजकारणात येतील असे वाटत नव्हते. पण ते आधी राज्यमंत्री झाले आणि आता कॅबिनेट मंत्री झाले. आम्ही मात्र अजून वाट बघतो आहोत. आता राजकारणात राजकीय ‘वरिष्ठता’ अशी काही राहिली नाही. तेव्हा आता आमच्याकडे पाहा, या शब्दांत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबाबतची नाराजी व्यक्त केली.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आता भाजपने भविष्यात साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. औरंगाबाद शहरातील एका रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास आमदार शिरसाठ व सहकारमंत्री अतुल सावे एकाच व्यासपीठावर आले होते.औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातून ३१७ कोटींचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले होते. नव्याने रुजू झालेले आयुक्त अभिजीत चौधरी यांनी या कामास तरतूद नसल्याने कात्री लावली. मात्र, या कामांसाठी तरतूद केली जाईल असे आश्वासन देत शहरातील रोपळेकर रुग्णालय ते जवाहरनगर पाेलीस ठाण्यापर्यंतच्या सिंमेटच्या रस्त्याचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना शिरसाठ म्हणाले,‘‘ हा रस्ता पूर्वी का घेतला नाही, माहीत नाही. ‘पण मला वाट बघायची सवय आहे. ’ या वाक्यानंतर मंत्रिपद न मिळाल्याची खंत आमदार शिरसाठ यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपचे काम करणारे कार्यकर्ते किशाेर शितोळे यांनीही आता सहकार्य करावे, असे म्हणत भाजपने पाठिशी उभे रहावे असे आवाहन आमदार शिरसाठी यांनी केले. त्यांच्या या आवाहनावर मंत्री अतुल सावे यांनी, ‘तुमच्या प्रचाराचा नारळ मंत्री म्हणून मीच फोडेन’, असे सांगितले. पुढील काळातही भाजप आमदार संजय शिरसाठ यांना साथ देईल असे सांगत तुमच्या मनातील शंका दूर करा, असेही सावे म्हणाले. त्यांनी शिरसाठ यांचा उल्लेख भावी मंत्री असाही केला.
निधीची कमतरता पडणार नाही शहरातील विविध रस्त्यांची कामे तरतूद नसल्याचे सांगत बंद करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत चौधरी यांनी दिल्या होत्या. मात्र, शहरातील पायाभूत सुविधांसाठी आता निधीची कमतरता पडणार नाही, असे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले. मंत्री सावे यांनीही त्यांना दुजोरा दिला. हे दरम्यान औरंगाबाद शहरातील सातारा व देवळाई परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ७० कोटी रुपयांचा निधी आणला होता. मंत्री सावे यांनीही मुख्यमंत्र्यांकडून विकासकामाचा निधी आणला होता व ती सारी शिफारशीची पत्रे मी पाहिली आहेत. त्यामुळे आता निधीसाठी मला कोठे रोखू नका, असेही शिरसाठ म्हणाले.