लक्ष्मण राऊत
जालना : जालना येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल सध्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिकेत आहेत. दीड महिन्यांपूर्वी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या वतीने जालना शहरात घेण्यात आलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात अब्दुल सत्तार यांनी प्रशासकीय कारकीर्द येईपर्यंत आमदार गोरंट्याल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरपरिषदेवर केलेली टीका हे यासाठी निमित्त ठरले आहे. काँग्रेसच्या म्हणजे पर्यायाने आमदार गोरंट्याल यांच्या वर्चस्वाखाली नगरपरिषद असताना जालना शहरातील पिण्याचे पाणी, रस्ते, नाट्यगृह इत्यादींकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगून अब्दुल सत्तार यांनी टीका केली होती. त्यानंतर मागील दीड-पावणेदोन महिन्यांत आमदार गोरंट्याल यांनी अनेकदा अब्दुल सत्तार यांना टिकेचे लक्ष्य केले आहे.
अलिकडेच सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सत्तार यांनी अवमानजनक वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देऊन प्रतिनिधींशी बोलताना आमदार गोरंट्याल म्हणाले, मंत्रीपदामुळे सत्तार मोठे झाले. परंतु त्यांची बुद्धी मोठी झाली नाही. अब्दुल सत्तार यांना शेलकी विशेषणे लावून ते म्हणाले, एकदा राहुल गांधी यांची भारत जोडो या महाराष्ट्रात येऊन जाऊ द्या, मग त्यांची मस्ती जिरवतो.
हेही वाचा… पाच तासांत तयार होते नवीन गाव
आमदार गोरंट्याल म्हणाले, शिवसेनेतून फुटलेल्या गटावर आपण टीका केली म्हणून अब्दुल सत्तार माझ्याविरुद्ध वक्तव्य करीत आहेत. हिंदू गर्व गर्जना मेळाव्यासाठी आले तेव्हा अब्दुल सत्तार त्यांच्या मूळ विषयावर बोलण्याऐवजी नगरपरिषदेचे निमित्त करून माझ्यावर घसरले. जालना नगरपरिषद आमच्या ताब्यात असताना पाणी, रस्ते किंवा अन्य नागरी सुविधांच्या प्रश्नांवरून एकही मोर्चा निघाला नाही, हे त्यांना माहीत नाही. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमधील रस्ते आणि पाण्याची अवस्था किती वाईट आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या सिल्लोड शहरात नागरी सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करून हा बाहेरचा भोंगा जालना शहरात येऊन बडबड करीत आहे. अब्दुल सत्तार हे कधी कुणाचेच होऊ शकले नाहीत. अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, नारायण राणे यांच्यासमवेत राहून ते कधी त्यांचे झाले नाहीत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कसे काय होऊ शकतील? अब्दुल सत्तार हा मिठाचा खडा असून त्यांच्यामुळे शिंदे सरकारला कधी धोका होईल, सांगता येत नाही.
हेही वाचा… भारत जोडो यात्रेत बिरसा मुंडा यांचा आठव
आमदार गोरंट्याल यांनी अलिकडच्या काळात अब्दुल सत्तार यांच्यावर केलेली टीका हा जालना जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झालेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध काढलेल्या अवमानजनक वक्तव्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने जालना शहरात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळीही जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. या अनुषंगाने शेख महेमूद म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी जालना शहरातील नागरी सुविधांचे निमित्त करून अप्रत्यक्षरीत्या आमदार गोरंट्याल यांच्यावर केलेली टीका तथ्यहीन आहे. काहीतरी करून प्रसिद्धीत राहण्यासाठी अब्दुल सत्तार यांची नेहमी धडपड चालू असते.