बदलापूरः अंतर्गत कलहामुळे भाजपात उघड दुफळी माजली असतानाच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्यापुढे नवनवी आव्हाने उभी राहत आहेत. एकीकडे पक्षातील कपिल पाटील कथोरे यांना आव्हान देत असतानाच आता शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि सुभाष पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. मनसेनेही येथे उमेदवारी देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कथोरेंच्या अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ब्राह्मण समाज महामंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीवरून देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांकडे नाराजी

ठाणे जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना स्थानिक राजकारणाचा फटका बसतो आहे. अनेक पक्षांतर्गत विरोधकांनी विद्यमान आमदारांची वाट बिकट केली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला. या पराभवाचे खापर त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले. लोकसभेच्या निकालापासून विविध मंचावर पाटील यांनी कथोरे यांनी कोंडीत पकडले आहे. आता नुकत्याच एका बैठकीत पाटील यांनी कथोरे यांच्याविरूद्ध निष्ठावंत आणि जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांची फळी उभारण्याची सुरूवात केली. लोकसभेत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना जागा दाखवू असे आवाहन त्यांनी यावेळी केलेे होते. या बैठकीत कथोरे यांनी बाजूला सारलेले मुळ भाजपातील पदाधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे याचा फटका कथोरे यांनी येत्या निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त होते आहे. यात कथोरे यांच्यावर नाराज भाजप पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा >>> सोलापूरमध्ये विजय देशमुख यांच्यावर कुरघोडीसाठी भाजपअंतर्गत विरोधक एकवटले

त्याच महायुतीचा महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे) महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही किसन कथोरे यांच्याविरूद्ध रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यात किसन कथोरे यांचे परंपरागत विरोधी असलेले गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार इच्छुक आहेत. त्यांनी गणेशोत्सवापासून प्रचाराला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे नुकतीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली दावेदारी सांगतल्याची चर्चा आहे. त्याचवेळी सुभाष पवार यांनी पर्याय म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाकडेही तिकीटासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सुभाष पवार कोणत्याही माध्यमातून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जाते. तर शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख वामन म्हात्रेही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरेही इच्छुक आहेत. सोबतच मनसेच्या वतीने महिला आघाडी प्रमुख संगिता चेंदवणकर यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे बदलापुरातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त होते. या सर्वांमुळे आमदार किसन कथोरे यांच्या विविध आघाड्यांवर लढा द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. या सर्वांवर ते कशाप्रकारे मात करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla kisan kathore face new challenges in murbad assembly constituency print politics news zws