नवी मुंबई : राज्यस्तरीय कोळी भवनाच्या शुभारंभ प्रसंगी नवी मुंबईत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उमेदवारीसाठी घातलेली ‘साद’ सध्या शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दावा ठोकल्यामुळे ‘बेलापूर’मधून यंदा म्हात्रे यांना उमेदवारी मिळणार का अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे. असे असताना ‘ठाणे जिल्ह्यात तुमची एकमेव लाडकी बहीण मी आहे, मला आशिर्वाद द्या’ असे आर्जव म्हात्रे यांनी भर सभेत करत शिंदे-फडणवीसांच्या समक्षच एकप्रकारे नाईक यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या ‘मिरज पॅटर्न’ने विरोधकांना धक्का

ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या १८ जागा या भाजप-शिंदेसेनेसाठी महत्वाच्या मानल्या जात असल्या तरी बेलापूर, मीरा-भाईदर, मुरबाड, कल्याण पुर्व अशा काही जागांवर महायुतीत आणि विशेषत: भाजपमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरु असल्याचे चित्र आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे या सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात बेलापूरमध्ये महायुतीला १२ हजार तर ऐरोली विधानसभा क्षेत्रातून जेमतेम नऊ हजार मते अधिक मिळाली. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत हे मताधिक्य मोठया प्रमाणावर घटल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातही सध्या उत्साहाचे वातावरण आहे. एकीकडे हे चित्र असताना बेलापूर मतदारसंघावर भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दावा सांगितला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाईक या मतदारसंघात दौरे काढत असून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारीवर दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला असून रविवारी सायंकाळी कोळी भवनाच्या कार्यक्रमानिमीत्त नवी मुंबईत आलेल्या शिंदे-फडणवीसांपुढे म्हात्रे यांनी थेट गाऱ्हाणे घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

हेही वाचा >>> विखे यांचे वर्चस्व असलेल्या नगर जिल्हा बँकेच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक

तुमच्या ताईला साथ द्या …

राज्यात महायुती सरकारमार्फत आखण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चर्चेत असताना मंदा म्हात्रे यांनी नेमका हाच धागा पकडत शिंदे-फडणवीस यांना ‘मी तुमची लाडकी बहीणच’ अशी साद घातली. ‘ठाणे जिल्ह्यात मी तुमची एकमेव लाडकी बहीण आमदार आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. तुम्ही दोघे भाउ मला आशिर्वाद द्या’ अशा शब्दात म्हात्रे यांनी दोघा नेत्यांना साद घातली. विशेष म्हणजे, यावेळी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हेदेखील व्यासपिठावर उपस्थित होते. दरम्यान राज्यात जो आमदार काम करतो त्याच्या कामाचे सर्वेक्षण पक्ष करत असतो. त्यामुळे माझ्या कामाचे प्रगतीपुस्तक पक्षाकडे आहे. माझी विजयाची हेट्रीक यावेळी नक्की होईल, असा दावा म्हात्रे यांनी या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला.

पाटील यांचेही कौतुक

यावेळी कार्यक्रमात बोलताना आमदार मंदा म्हात्रे यांनी विधान परिषदेचे आमदार आणि कोळी महासंघाचे नेते रमेश पाटील यांचे केलेले कौतुकही चर्चेचा विषय ठरले. आमदार रमेश पाटील हे चांगले उद्योजक असून त्यांनी कधीही भ्रष्टाचाराची वाट धरली नाही असा उल्लेख म्हात्रे यांनी केला. रमेश पाटील हे चारित्र्यवान आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करणारे नेते आहेत, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla manda mhatre seek ticket for belapur assembly constituency from cm eknath shinde dcm fadnavis print politics news zws