Nitin Deshmukh in Balapur Assembly Constituency : शिवसेनेतील फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आणि नंतर गुवाहाटीहून (आसाम) परत आलेले ठाकरे गटाचे शिलेदार व बाळापूरचे विद्यामान आमदार नितीन देशमुख त्या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आले. आता विधानसभा निवडणुकीत देशमुख यांना महायुती आणि वंचितच्या उमेदवारांशी संघर्ष करावा लागणार आहेच; पण त्याबरोबरच तपास यंत्रणांनी लावलेला चौकशीचा ससेमिराही त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगाचे केंद्र म्हणून बाळापूर विधानसभा मतदारसंघाकडे बघितले जाते. राज्यात शिवसेनेत फूट पडल्यावर झालेल्या राजकीय भूकंपाच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत व गुवाहाटी येथे गेलेले नितीन देशमुख नंतर उद्धव ठाकरेंकडे परतले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे गटात त्यांचे महत्त्व वाढले. ऐनवेळी परतल्याने देशमुख हे शिंदे गटाच्या निशाण्यावर आहेत. देशमुखांकडून दगाफटका झाल्याची भावना या गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असून बाळापुरातून देशमुखांविरोधात लढण्याचा आग्रह केला जात आहे. या जागेवर शिंदे गटाचा दावा आहे.

हेही वाचा >>>Mahant Ramgiri Maharaj: महंत रामगिरी महाराज कोण आहेत? कोणत्या विधानामुळे त्यांच्यावर ५१ एफआयआर दाखल झाले?

पाच वर्षांमध्ये मतदारसंघाच्या राजकीय समीकरणात व्यापक फेरबदल झाले. २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून संग्राम गावंडे यांनी निवडणूक लढवत १६ हजार ४९७ मते घेतली होती. ‘मविआ’तील प्रमुख घटक पक्षांची एकत्रित मोट बांधून त्यांची मते शिवसेनेकडे वळविण्याचे मोठे आव्हान नितीन देशमुखांपुढे राहील. जिल्ह्यात ‘शत-प्रतिशत’ यश मिळविण्यासाठी भाजपकडून चाचपणी केली जात आहे. वंचित आघाडीचे बाळापूर मतदारसंघावर प्राबल्य राहिले. गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याचे प्रयत्न त्यांचे राहतील. लोकसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघात काँग्रेसने नऊ हजार ८४४ मतांनी आघाडी घेतली होती. नितीन देशमुख यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरू शकते.

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार नितीन देशमुख यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्या जिल्हा परिषद कार्यकाळासह कुटुंबीयांचीदेखील माहिती घेण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चौकशीला वेग दिल्याने आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा >>>कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची साथ सोडून सहकारातील बडे नेते पुन्हा महाविकास आघाडीत

मतदारसंघाचा पूर्वइतिहास

१९९९ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव तायडे बाळापूरमधून निवडून आले. त्यानंतर गेल्या २० वर्षांत जिल्ह्यात काँग्रेसला यश मिळाले नाही. २००४ मध्ये भाजप, तर २००९ व २०१४ मध्ये सलग दोन निवडणुकांमध्ये वंचितने (तत्कालीन भारिप-बमसं) वर्चस्व राखले. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून नितीन देशमुख यांनी १८ हजार ७८८ मतांनी विजय मिळवला. वंचितचे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना ५० हजार ५५५, तर ‘एआयएमआयएम’ कडून निवडणूक लढणारे डॉ. रहेमान खान यांना ४४ हजार ५०७ मते मिळाली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla of balapur nitin deshmukh in the assembly elections clash with the mahayuti and vanchit bahujan aghadi candidates print politics news amy