हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी मतदारसंघात बोलवा, त्यांच्या याद्या तीन दिवसात सादर करा, त्यासाठी त्यांना ‘फोन पे’, ‘गुगल पे करा’ काही करा, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून २४ तासांत खुलासा करावा, असे निर्देश दिले आहेत.

कळमनुरी येथे शुक्रवारी आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आमदार बांगर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. या शिवाय महायुतीच्या मागील अडीच वर्षांच्या काळात केलेल्या कामाचा लेखाजोखाही मांडला. या कार्यक्रमात बोलताना आमदार बांगर यांनी विधानसभा मतदारसंघातील बाहेरगावी असलेल्या मतदारांची यादी तयार करण्याच्या सूचना करून त्यांना मतदानासाठी आणण्यासाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था करावी. त्यासाठी ‘फोन, पे व इतर माध्यमातून त्यांची पूर्तता, व्यवस्था करा, असे सांगितले.

हेही वाचा >>> गौरी लंकेश हत्येतील आरोपीची शिवसेनेतून हकालपट्टी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारवाई

दरम्यान, आमदार संतोष बांगर यांच्या या वक्तव्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दखल घेत, चित्रफीत समाज माध्यमावर शेअर करून या रोख आमिषावर कारवाई करणार का, असा सवाल केला. आमदार बांगर यांच्या वक्तव्याप्रकरणी कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून बांगर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले.

खुलासा करण्याचे निर्देश

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी प्राप्त तक्रारीची दखल घेऊन कळमनुरीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण पाठवले. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी आमदार संतोष बांगर यांना या प्रकरणात २४ तासात खुलासा देण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.