महायुतीच्या उमेदवारांविरोधात मनसेचे उमेदवार जाहीर; ठाण्यात अविनाश जाधव, तर कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांना उमेदवारी

पाटील यांच्याविरोधात शिंदे यांच्याकडून लवकरच उमेदवार जाहीर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

mns candidates against mahayuti in thane and kalyan
प्रातिनिधिक फोटो लोकसत्ता

ठाणे : लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या ठाणे आणि कल्याणमधील उमेदवारांच्या विजयासाठी मैदानात उतरलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी ठाणे आणि कल्याण ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांविरोधात आपले उमेदवार जाहीर केले. भाजपचे विद्यामान आमदार संजय केळकर यांच्याविरोधात मनसे नेते अविनाश जाधव, तर कल्याण ग्रामीणमध्ये विद्यामान आमदार प्रमोद (राजू) पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

हेही वाचा >>> काँग्रेसची ६२ जागांची पहिली यादी आज; ९६ उमेदवारांवर शिक्कामोर्तब; शिवसेनेबरोबरचा वाद मिटवण्याची जबाबदारी थोरातांवर

कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत डॉ. शिंदे यांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये मनसे आमदार पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. असे असतानाच पाटील यांच्याविरोधात शिंदे यांना उमेदवार द्यावा लागणार असून हा उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार शिंदे यांच्यावर आमदार पाटील हे समाजमाध्यमांद्वारे सातत्याने टीका करीत होते. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वादही रंगला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि यानंतर खासदार शिंदे आणि आमदार पाटील हे एकत्र आल्याचे चित्र दिसले होते.

ठाण्यातील शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याणमधील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी कळव्यात संयुक्त सभा घेतली होती. या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांनी तर कल्याणमध्ये आमदार पाटील यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणूक कामासाठी मैदानात उतरविले होते. यामुळेच विधानसभा जाधव आणि पाटील यांच्या झालेल्या मदतीची परतफेड शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु पाटील यांच्याविरोधात शिंदे यांच्याकडून लवकरच उमेदवार जाहीर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns announced candidates against mahayuti in thane kalyan print politics news zws

First published on: 22-10-2024 at 07:13 IST
Show comments