कल्याण पट्ट्यात मनसे-भाजपची हातमिळवणी ?

कल्याण, डोंबिवली पट्ट्यात राजू पाटील यांचा एकमेव अपवाद वगळता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी रात्रीपर्यंत एकही उमेदवार दिला नसल्याने येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

MNS-BJP Kalyan, BJP Kalyan, MNS Kalyan, Kalyan latest news,
कल्याण पट्ट्यात मनसे-भाजपची हातमिळवणी ? (image credit – Raj Thackeray/fb/loksatta graphics)

डोंबिवली : शिवसेना एकसंघ असतानाही राज ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारांच्या पदरात एकेकाळी मतांचे भरभरुन दान टाकणाऱ्या कल्याण, डोंबिवली पट्ट्यात राजू पाटील यांचा एकमेव अपवाद वगळता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी रात्रीपर्यंत एकही उमेदवार दिला नसल्याने येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे मंत्री आणि डोंबिवलीतील प्रभावी उमेदवार रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात पाच वर्षांपूर्वी मनसेच्या चिन्हावर मंदार हळबे यांनी चांगली लढत दिली होती. कल्याण पश्चिम, पूर्वेतही मनसेला मानणारा एक मोठा मतदार आहे. असे असताना या तिनही मतदारसंघात पक्षाने तगड्या उमेदवारांची साधी जुळवाजुळवही सुरु केली नसल्याची चर्चा आहे. कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील यांनी भाजपने तर डोंबिवली आणि कल्याण पूर्वेत भाजपला मनसेची साथ मिळावी यादृष्टीने पावले टाकली जात असल्याची चर्चा असून यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतही अस्वस्थता वाढू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांना या संपूर्ण मतदारसंघात मनसेची साथ लाभली. कल्याण ग्रामीण पट्ट्यात राजू पाटील यांनी शेवटच्या क्षणी शिंदे यांच्या मदतीसाठी पूर्ण ताकद लावली. राजू यांच्या मदतीच्या ओझे शिंदेसेना उतरविणार का याविषयी या मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चा असतानाच पक्षाच्या पहिल्या यादीत अजूनही येथून उमेदवार देण्यात आलेला नाही. राजू पाटील आण रविंद्र चव्हाण यांच्यात असलेली राजकीय सलगी कधीही लपून राहीलेली नाही. पाच वर्षांपूर्वी एकसंघ शिवसेनेशी दोन हात करताना राजू पाटील यांना भाजपचा अदृश्य हात मदतीला आल्याची चर्चाही रंगली होती. या परिस्थितीत पक्षाच्या पहिल्या यादीत डोंबिवलीसारख्या मतदारसंघात मनसेने उमेदवार दिला नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, कल्याण पूर्वेतील प्रतिष्ठेच्या लढाईतही मनसे कुणाच्या पारड्यात आपली ताकद उभी करते याविषयी उत्सुकता आहे.

हेही वाचा – कोकणात भाजपमधील असंतुष्ट ठाकरे गटाच्या वाटेवर

प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्यासारखा तगडा आमदार डोंबिवली जवळच्या कल्याण ग्रामीणचे मनसेचे नेतृत्व करत आहे. डोंबिवली, कल्याण ग्रामीण एकसंघ पट्ट्यात मनसेची ताकद आहे. यापूर्वी मनसेमधून डोंबिवली विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या मंदार हळबे यांनी ४३ हजार मतांचा टप्पा पार केला होता. चव्हाण यांचे राजकारण मान्य नसणारा एक मोठा वर्ग डोंबिवलीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला बराचसा मतदार मनसेसोबत सुरुवातीच्या काळात राहिला होता. हळबे यांना मिळालेल्या मतांमध्येही डोंबिवलीतील सुजाण, जुन्या मतदारांचा समावेश राहिला होता. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पेंडसेनगर ते राजाजी भागात मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. गेल्या दोन सत्रांपासून संत साहित्याचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावान मनसेचे विधानसभा प्रमुख प्रल्हाद म्हात्रे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण त्यांना मुंबई आणि पलावातून सिग्नल मिळत नाही असे चित्र आहे. डोंबिवलीत भाजपचे रवींद्र चव्हाण यांना मनसेच्या उमेदवारीमुळे आव्हान उभे राहू शकते. असे असताना डोंबिवलीत उमेदवार का जाहीर होत नाही, असा सवाल आता पक्षातूनच उपस्थित होत आहे.

हेही वाचा – कोकणात भाजपमधील असंतुष्ट ठाकरे गटाच्या वाटेवर

ग्रामीणमध्ये मदतीची आस

डोंबिवलीत चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार देण्यात वेळकाढूपणा करायचा, त्याबदल्यात कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील यांच्यामागे भाजपची रसद उभी करायची असे सरळ गणित या दोन पक्षात आखले जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राजू यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही याविषयी शिंदे यांच्या शिवसेनेतही चर्चा सुरु आहे. पाच वर्षांपूर्वी राजू यांच्या विजयात भाजपची छुपी साथ होती असेही बोलले जाते. त्यामुळे भाजप-मनसेच्या या तिरक्या चालीकडे शिंदेसेनेचे नेते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कल्याण पूर्वेत मनसेचा उमेदवार दिला गेल्यास त्याचा फटका सुलभा गणपत गायकवाड यांनाच बसेल अशी भाजपला भीती आहे. येथे मुख्यमंत्र्यांनी कितीही आवाज काढला तरी शिंदेसेनेचे नेते गायकवाड यांना मदत करायला तयार नाहीत. याठिकाणी मनसेकडून उमेदवार देताना सर्व बाजूंचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns bjp together in kalyan area print politics news ssb

First published on: 24-10-2024 at 14:02 IST
Show comments