चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ठाकरे गटाचे नेते येतील असा अंदाज बांधला जात होता व त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. प्रत्यक्षात काहीच हाती येत नसल्याने शिवसेनेने मनसेलाच खिंडार पाडत या पक्षाच्या जिल्हा सचिवाला शिवसेनेत प्रवेश दिला. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्याबरोबर असलेले जिल्हा सचिव मनोज गुप्ता यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मनसेचे निरीक्षक व पदाधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त करीत गुप्ता यांनी सेनेत प्रवेश केला.

हेही वाचा >>> गौतम अदाणी प्रकरणावरून विरोधक आक्रमक; थेट ईडी मुख्यालयावर मोर्चा!

सेनेतील बंडानंतर शिंदे यांच्याबरोबर जिल्ह्यातून रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल गेले. जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते मूळचे शिवसैनिक आहेत. या दोन प्रमुख नेत्यांसह जिल्हाप्रमुख (ग्रामीण) संदीप इटकेलवार, मंगेश काशीकर यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. यापैकी अनेकांची प्रमुख पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केलेला नाही.

हेही वाचा >>> शाखा महिलांसाठी नाहीत; संघ महिलांसाठी वेगळे कार्यक्रम आखण्याच्या तयारीत

दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता व चिन्ह दिले. त्यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक व नेते शिंदेंच्या गटात प्रवेश करतील असा दावा केला जात होता. पक्ष प्रवेशाचे मुहूर्तही ठरवले जात होते. प्रत्यक्षात मनसेच्या एकाच्या नेत्याने प्रवेश केला. नागपूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यापैकी रामटेक गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. गावागावात शिवसेनेच्या शाखा आहेत. अद्याप त्यात दुफळी दिसून येत नसली तरी ठाकरेंचे नेतृत्व मानणाऱ्या शिवसैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांच्यावर शिंदेंच्या शिवसेनेचा डोळा आहे. विदर्भातील बडे नेतेही अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असे खासदार कृपाल तुमाने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले शिवसेनेची शिवधनुष्य यात्रा विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, सिंदखेडा राजा या भागातून जाणार आहे, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns district secretary manoj gupta joined eknath shinde shiv sena print politics news zws