अविनाश कवठेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राज यांची भूमिका उचलून धरली. नवी पेठ परिसरातील मनसे कार्यालयात आता भारत नाही, हिंदूंचा हिंदुस्थान असे वाक्य लिहिलेला राज ठाकरे यांचा फलक झळकला.. राज ठाकरे यांचे भगवी शाल गुंडाळलेले छायाचित्र आणि पाठीमागे भगव्या रंगातील देशाचा नकाशा या फलकावर आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या फलकाचे अनावरण मनसे कार्यालयात झाले. येत्या काही दिवसांत शाखानिहाय असे फलक लावण्यात येतील, असे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी हिंदू जननायक अशा आशयाचा फलक काही दिवसांपूर्वी उभारला होता. सध्या नव्याने उभारलेल्या या फलकाबरोबरच सदस्य नोंदणी अभियानालाही प्रारंभ करण्यात आला. या बदलत्या भूमिकेला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी मनसेची बदलती भूमिका मतदारांना किती प्रमाणात आकर्षित करणार, हा प्रश्न कायम आहे.
मराठी, मराठी भाषकांवरील अन्याय आणि परप्रांतियांचा मुद्दा मनसेकडून काही वर्षांपर्यंत हाती घेण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेची पक्ष बांधणी सुरू झाली आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतर सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करून निवडणुकीची तयारी मनसेकडून सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदूंचा हिंदुस्थान हीच देशाची खरी ओळख आहे. देशाला भारत असे संबोधित करून ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापूर्वीच्या कागदपत्रांवरून तसेच विदेशी पर्यटकांकडूनही हिंदुस्थान असे नमूद करण्यात आले होते. त्यासाठी आता शहरात असे फलक उभारण्यात येतील. घरोघरी जात हिंदूंचा हिंदुस्थान याबाबत माहिती दिली जाईल. तरुण-तरुणींना हिंदुस्थानचे महत्व पटवून दिले जाईल. मनसेच्या प्रत्येक शाखेत तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय हिंदूंचा हिंदुस्थान अशा आशयाचे फलक उभारण्याचे नियोजित आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मनसेची हिंदुत्वाची भूमिका नागरिक स्वीकारतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मनसेच्या या बदलत्या भूमिकेवर भारतीय जनता पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे. यासंदर्भातील भूमिका पक्षाचे वरिष्ठ नेतेच स्पष्ट करतील, असे शहर पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मनसेच्या या नव्या भूमिकेबाबत तरुणांमध्ये आकर्षण असले आणि त्याचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले असले तरी निवडणुकीच्या दृष्टीने मनसेचे हिंदुत्व किती स्वीकारले जाईल, याचे उत्तर येत्या काही दिवसांतच मिळणार आहे.