मुंबई : महायुतीत सामील करून घेण्यासाठी परप्रांतियांविरोधातील तलवार म्यान करण्याची आणि खळ्ळ्य खट्ट्याक बंद करण्याची अट भाजपने मनसेपुढे ठेवली आहे. मराठी माणसाला त्याचे हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी परप्रांतीयांना विरोध, आंदोलने व मारहाणीचे प्रकार बंद करावे लागतील, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केली आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसेचा समावेश महायुतीमध्ये करण्यासंदर्भात ठाकरे यांनी नवी दिल्लीला जाऊन शहा यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून व त्याआधीही भाजप-मनसे युतीची चर्चा अनेकदा झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आदी नेत्यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाजप व मनसेचे सूर जुळत असले तरी परप्रांतीयांना विरोधाची भूमिका भाजपला मान्य नाही.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे ‘धनुष्य’ गणेश नाईकांच्या खांद्यावर? ठाण्याच्या जागेसाठी मनोमिलन?

महाराष्ट्रात मराठी माणसाला त्याचे हक्क व सन्मान मिळायला हवेत. त्याच्यावर अन्याय होऊ नये, अशी भाजपचीही भूमिका आहे. पण ते करताना परप्रांतीयांविरोधात आंदोलन करून त्यांना धमक्या देणे, मारहाण करणे, हे प्रकार मनसेने करू नयेत, अशी अट भाजपने ठेवली आहे. मनसेशी युती करताना उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आदी राज्यांमध्ये फटका बसू नये, याची काळजी भाजप घेणार आहे. मनसेचा आक्रमकपणा व परप्रांतियांना विरोधामुळे भाजपमधील उत्तर भारतीय व अन्य नेत्यांचा विरोध आहे.

हेही वाचा – जरांगे यांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता, ‘मराठा मतपेढी’ दिशा देणार

मनसेत एकमेव आमदार असून अन्य नेते शिवसेना व इतर पक्षात गेले. त्यानंतर मनसे आता संपली असून राज ठाकरे यांची दखल घेण्याचीही गरज नसल्याचे प्रतिपादन फडणवीस व अन्य नेत्यांनी गेल्या काही वर्षांत केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी देशाची वाट लावली आहे, उद्योगपतींचे केवळ भले होत आहे, असे आरोप राज ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे आता मनसेची महायुतीत गरज काय, असा भाजप नेते व पदाधिकाऱ्यांचा आक्षेप असून त्यांची नाराजी आहे.

हेही वाचा – मिरजेतील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

ताकद नसलेल्या पक्षासाठी लोकसभा व विधानसभेसाठी जागा द्यायच्या, याला भाजपमधील अनेकांचा विरोध आहे. शिवसेनेने काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केल्यावर हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी लढाईची भूमिका सोडल्याची टीका राज ठाकरे यांनी सातत्याने केली आहे. मात्र आता भाजपबरोबर जायचे असेल, तर मनसेला परप्रांतियांविरोधातील आंदोलने व भूमिका बदलण्याशिवाय पर्याय नाही. पूर्वी भाजप नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी जात होते. पण आता राज ठाकरे यांना दिल्लीला जावे लागले व शहा यांच्या भेटीसाठी काही तास वाट पहावी लागली. त्यामुळे हा मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न असून भाजपच्या अटी मान्य करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray amit shah meeting mns action against other state people stopped bjp condition for mahayuti print politics news ssb