गौतम अदाणी प्रकरणावरून काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक होऊ लागले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. राहुल म्हणाले की, संसदेत गौतम अदाणी प्रकरणावर नरेंद्र मोदींना चर्चा नको आहे. परंतु देशाला समजलं पाहिजे की, अदाणीच्या मागे कोणती शक्ती ठामपणे उभी आहे. राहुल म्हणाले की, ते दोन-तीन वर्षांपासून अदाणीचा मुद्दा उपस्थित करत आहेत, परंतु सरकारने त्यांचं काही ऐकलं नाही. संसदेत अदाणी मुद्द्यावर चर्चा होऊ नये यासाठी हे सरकार जोरदार प्रयत्न करत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, मी या सरकारबद्दल सातत्याने बोलत आहे. संसदेत अदाणी मुद्द्यावर चर्चा होईल याची या सरकारला भीती आहे. परंतु सरकारने यावर चर्चा होऊ दिली पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे की, सरकार यावर चर्चा का होऊ देत नाहीये. मी गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित करत आहे. हे सरकार चर्चेपासून दूर का पळतंय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हे ही वाचा >> “प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करतो, आम्ही साधू-संत नाही”; नितीन गडकरींचं विधान
गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं आंदोलन
अदाणी प्रकरणावर सरकारने उत्तर द्यावं यासाठी पक्षांनी संसदेच्या परिसरात निषेध नोंदवला. खासदारांनी यावेळी वेगवेगळ्या घोषणा दिल्या. “अदाणी-मोदी में यारी है, पैसे की लूट जारी है”, “एलआईसी बचाओ” आणि “नहीं चलेगी और बेईमानी, बस करो मोदी-अदाणी” अशा प्रकारच्या घोषणा खासदारांनी संसदेबाहेर दिल्या. तसेच युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज देशभर आंदोलन करत मोदी सरकारचा निषेद नोंदवला.