परभणी : काँग्रेसला ‘रजाकार’ ठरवत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू मतदारांना चुचकारले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा ‘नकली शिवसेना’ असा उल्लेख करून शिवसेनेच्या परंपरागत हिंदुत्ववादी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या प्रचारार्थ परभणीत जाहीर सभा झाली. या भाषणात पंतप्रधानांनी प्रामुख्याने शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली. मराठवाड्यावर दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती. सत्तेवर असताना काँग्रेस आणि ‘नकली’ शिवसेनेने निजामाचे राज्य गेले आहे हे जाणवूच दिले नाही असा आरोप करून मराठवाड्याचा विकास होऊ न देणाऱ्या रजाकारी मानसिकतेला आपण थारा देणार काय ? असा प्रश्न येथील जाहीर सभेत मोदी यांनी उपस्थित केला. एकाच वेळी काँग्रेस व उद्धवसेनेविरुद्ध टीका करून सेनेच्या परंपरागत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न मोदींनी आपल्या भाषणातून केला.
हेही वाचा – तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
१९८९ पासून परभणी या मतदारसंघावर असलेले शिवसेनेचे वर्चस्व हे भाजप पुढचे आव्हान आहे आणि सेनेचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या मतदारसंघावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घकाळ असलेल्या प्रभावाचा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणातून केला. ‘बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून प्रेरणा घेणारी ही भूमी आहे’ असा स्पष्ट उल्लेख करत जो मतदार शिवसेनेशी जोडलेला आहे तो हिंदुत्वाच्या नावाखाली आपलासा करून सेनेच्या परंपरागत मतपेढीला विचलित करण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला. भाषणाच्या शेवटी पालघर साधूंच्या हत्येची चेष्टा करणाऱ्यांना महाराष्ट्रात जागा द्यायची का ? रजाकारी मानसिकतेला तुम्ही थारा देणार का ? असे प्रश्न त्यांनी याच हिंदुत्ववादी मतदारांसाठी उपस्थित केले.
हेही वाचा – हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय?
परभणी हे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील चळवळीचे मोठे केंद्र होते. निजामी सत्तेविरुद्ध येथील जनतेने मोठी झुंज दिली. स्वाभाविकच निजाम आणि रजाकार यांच्याविषयी नकारात्मक भावना गेल्या अनेक पिढ्यांपासून येथे आहे. ‘खान पाहिजे की बाण पाहिजे’ हा मुद्दा यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेने वापरलेला आहे. सुरुवातीला मराठवाड्यात पाय रोवण्यासाठी ‘रजाकार’ हाच शब्द वापरून शिवसेनेने मराठवाड्यातील जनतेला आपलेसे केले होते. आता परभणीत पुन्हा मोदी यांनी तेच हत्यार वापरले. ‘राष्ट्रसंत पाचलेगावकर यांनी संन्याशी असूनही निजामी राजवटीविरुद्ध संघर्षाचे नेतृत्व केले.’ हा जिल्ह्यातील संदर्भही मोदींनी आपल्या भाषणातून दिला. काँग्रेसला ‘रजाकार’ आणि शिवसेनेला ‘नकली शिवसेना’ असे संबोधत मोदी यांनी शिवसेनेच्या जुन्याच धार्मिक ध्रुवीकरणाला नव्या रूपात पुढे आणले आहे.