Mohan Bhagwat West Bengal Visit: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पश्चिम बंगालमध्ये आज एक मोठी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेने त्यांचा १० दिवसांचा पश्चिम बंगाल दौराही समाप्त होणार आहे. त्यांची ही सभा बंगालमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहे कारण, न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांची ही जाहीर सभा होत आहे. पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरू असल्याने पूरबा वर्धमान जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला आरएसएसच्या सभेला परवानगी नाकारली होती. त्यानंतर संघाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या सभेला परवानगी दिली.
भागवत यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचे महत्त्व
मोहन भागवत यांनी त्यांच्या दहा दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात संघाच्या अनेक नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी संघाचे संघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मोहन भागवत यांनी आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचीही भेट घेतली. दरम्यान भागवत यांचा हा पश्चिम बंगाल दौरा म्हत्त्वाचा मानला जात आहे, कारण येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर शेजारील देश बांगलादेशशी संबंध बिघडलेले आहेत त्यामुळे बंगालच्या सीमावर्ती भागात तणाव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील बंगाल सरकारवर टीका करताना, संघाचे पश्चिम बंगालचे सरचिटणीस जिष्णू बसू म्हणाले, “भागवत यांच्या सभेसाठी आम्हाला न्यायालयाचे दरवाजे का ठोठावावे लागत आहेत? दिवसेंदिवस बंगालमधील प्रशासन कमकुवत होत आहे. ते राजकीय दबावाखाली आहेत. ते आमच्यासारख्या संघटनेसाठी अनावश्यक अडथळे निर्माण करत आहे. बंगाल एक सीमावर्ती राज्य आहोत आणि प्रशासनाने कायदा, सुव्यवस्था आणि सीमावर्ती भागात वाढत्या तणावाकडे लक्ष दिले पाहिजे.”
पाच मुद्द्यांचा प्रचार
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शताब्दी वर्षात, आम्ही पर्यावरण संरक्षण, सामाज, स्वतःची भाषा, उत्पादन आणि संस्कृती, कुटुंब व्यवस्थापन आणि नागरिक कर्तव्य या पाच मुद्द्यांचा प्रचार करत आहोत. या पाच मुद्द्यांचा प्रचार करण्यासाठीच ते (भागवत) बंगालमध्ये आले आहेत,” असे बसू पुढे म्हणाले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
असा होता भागवतांचा पश्चिम बंगाल दौरा
८ फेब्रुवारी रोजी भागवत यांनी गेल्या ऑगस्टमध्ये कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या ज्युनियर डॉक्टरच्या पालकांची भेट घेतली होती.
नंतर, माध्यमांशी बोलताना, पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, “मोहन भागवत म्हणाले की, ते न्यायाच्या या लढाईत आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांना घटनेची आणि आमच्या भूमिकेची माहिती देणारे एक पत्र दिले आहे. त्यांनी सांगितले की ते आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्यांनी आम्हाला त्यांच्यासोबत जेवणाचे आमंत्रणही दिले आहे.”
१० दिवसांच्या दौऱ्यात, भागवत यांनी राज्यातील उत्तर, दक्षिण आणि मध्य या तीन प्रांतांमधील संघाच्या कार्यकर्त्यांसोबत बंद दाराआड बैठका घेतल्या. त्यांनी बंगाल, बिहार, सिक्कीम आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील राज्यस्तरीय स्वसंसेवकांची भेट घेतली होती. त्यांनतर भागवत यांनी वर्धमान शहरातील उल्लाश येथे मध्यप्रांताच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. शनिवारी त्यांनी पूर्व वर्धमान जिल्ह्यातील एका शाखेला भेट दिली होती. ६ फेब्रुवारी रोजी रात्री कोलकाता येथे आल्यानंतर, भागवत ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान संघाचे शहरातील प्रादेशिक मुख्यालय असलेल्या केशव भवन येथे संघ स्वयंसेवकांना भेटले होते. याचबरोबर त्यांनी इतर राज्यातील स्वयंसेवकांच्याही भेटी घेतल्या होत्या.