दीपक महाले
जनहिताचे प्रश्न हाती घेतले तर आपल्यापाठी लोक नक्की उभे राहतात, असा विश्वास व्यक्त करीत जिल्ह्याला जे जे हवे, ते नगरविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात येईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट संवादाच्या माध्यमातून जळगाव जिल्हा दौऱ्यात लोकांच्या भावनांना घातला. याआधी आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे काहीसे अस्वस्थ झालेले शिंदे गटाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानिमित्ताने बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
हेही वाचा… चंद्रकांत पाटील यांची जबाबदारी वाढली
मुख्यमंत्री शिंदे हे मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण, तसेच मुक्ताईनगर येथे विविध कामांचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्र्यांनी पाळधी येथेही महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांवर नाव न घेता फटकेबाजी केली. शिवाय, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अडीच वर्षांत न झालेल्या आणि रखडलेल्या विविध प्रकल्पांसह कामांना लवकरच मंजुरी देण्याची ग्वाही देत सभेत थेट लोकांशी संवादाच्या माध्यमातून समस्याही जाणून घेतल्या. करोनाच्या काळात दोन वर्षे घरात बसवून ठेवले…राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला गिळायला निघाला आहे…राज्यभरातील शिवसेनेच्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना ताकद दिली गेली… असे लोकांना भावतील असे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी मांडले. झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला कसे जागे करता येणार, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेता केला. आम्ही जे केलंय ते बरोबर होतं का, असा प्रश्न थेट उपस्थितांना विचारून त्यांच्याकडून प्रतिसादही मिळविला. सभेचे ठिकाण ग्रामीण भागातील असल्याने एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला पचनी पडत नाही का, असा चातुर्यपूर्ण प्रश्नही विचारुन लोकांच्या भावनांना हात घातला.
हेही वाचा… दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा धक्का देण्याची शिंदे गटाची योजना
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरमधील बालेकिल्ल्यात झालेल्या सभेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील समस्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या. शिंदे गटाकडून राष्ट्रवादीवर सातत्याने टीका केली जात असताना आमदार पाटील यांनी मात्र उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यामुळे संधी मिळाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांसमोरच त्यांचे आभारही मानले. खडसेंचे नाव घेता त्यांनी मतदारसंघात तीस वर्षांपासून विकासाचा अनुशेष असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेचा कारभार, केळी उत्पादकांच्या समस्या, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी असे अनेक विषय त्यांनी मांडले. दरम्यान, आधीच सभेला उशीर झाल्याने शिंदे यांच्या भाषणाआधीच लोक उठून जाऊ लागल्याने मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांना भाषण आवरते घ्यावे लागले. मुख्यमंत्री शिंदे यांनी एकूणच मांडण्यात आलेल्या सर्वच मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिलेली असली तरी त्या पूर्ण खरोखरच होणार काय, हाच प्रश्न आहे.