उमाकांत देशपांडे, इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : काँग्रेसचे आणखी आठ ते दहा माजी नगरसेवक शिवसेना-भाजपच्या वाटेवर असून ‘अधिक लाभ ’ मिळत असल्याने शिंदे गटात प्रवेश करण्यास काहींची अधिक पसंती आहे. तर काही नगरसेवक द्विधा मनस्थितीत असून राज्यात सत्ताधारी पक्षांमध्ये लगेच प्रवेश करायचा की काही काळानंतर करायचा की काही काळाने याचा अंदाज ते घेत आहेत. मात्र काही माजी नगरसेवकांचा पुढील काही दिवसात भाजपप्रवेश होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी महापालिकांमधील अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी काही महिन्यांपासूनच प्रयत्न सुरु केले आहेत. संबंधित नगरसेवकाच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन त्याला भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना ‘चांगला लाभ’ झाल्याची चर्चा असून त्यांना मतदारसंघाची बांधणी व निवडणुकीसाठी निधी मिळाला आहे. त्यांची प्रलंबित कामे मंजूर झाली आहेत. मुंबईत आणखी आठ-दहा नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईत ज्या माजी नगरसेवकांच्या क्षेत्रात भाजपचे प्राबल्य आहे, तेथे ते भाजपमध्ये येण्यास अनुकूल आहेत. मात्र शिवसेना ठाकरे किंवा शिंदे गटाचा प्रभाव असलेल्या भागात हे नगरसेवक शिंदे गटात जाण्यास उत्सुक आहेत.

हेही वाचा… बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत, लाभ भाजपला; मुलाचा मतदारसंघ वाचविण्याचा प्रयत्न

बाबा सिद्धीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर मिलींद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या क्षेत्रातील माजी मुस्लिम व अन्यही नगरसेवकांना मात्र भाजप-शिवसेनेपेक्षा काँग्रेसमध्ये राहिल्यास महापालिका निवडणूक जिंकता येईल, असे वाटत आहे. महापालिका निवडणुका वर्षअखेरीस होण्याची शक्यता असल्याने काही माजी काँग्रेस नगरसेवक हे घाई करण्यापेक्षा वाट पाहण्याच्या भूमिकेत आहेत. भाजपला मात्र लोकसभा निवडणुकीचे प्रमुख लक्ष्य असून त्यादृष्टीने ते माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवून पूनम महाजन, मनोज कोटक आणि शिवसेनेचे मतदारसंघही अधिक सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी या नेत्यांचा लवकरात लवकर पक्षप्रवेश करण्याचे भाजपची रणनीती आहे.

मुंबई महापालिकेत २०१७ मध्ये कॉंग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यापैकी काही नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मार्च २०२३ मध्ये अंधेरी परिसरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि संघटक कमलेश राय यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. कमलेश राय यांच्या पत्नी सुषमा राय या कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका होत्या. त्यांनी देखील शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

हेही वाचा… माढा मतदारसंघ : भाजपच्या उमेदवारीसाठी ‘दोन सिंहा’ची प्रतिष्ठा पणाला

त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये सायन कोळीवाडा येथील कॉंग्रेसच्या पाच नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यात माजी नगरसेविका पुष्पा कोळी, चांदिवलीतील वाजिद कुरेशी, धारावीतील माजी नगरसेवक आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त भास्कर शेट्टी, बब्बू खान, कुणाल माने व त्यांची माजी नगरसेविका पत्नी गंगा कुणाल माने यांचाही समावेश आहे. हे सर्व माजी नगरसेवक मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघातील आहेत. सायन कोळीवाडी येथील माजी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते रवी राजा हे देखील कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा गेल्या दीड दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र सध्यातरी ते वाट पाहण्याच्या भूमिकेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्याच महिन्यात कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत दहा माजी नगरसेवकांनी प्रवेश करतील, असा दावा शिवसेनेने केला होता. मात्र प्रत्यक्षात ज्यांचा पक्षप्रवेश झाला त्यात केवळ सहा माजी नगरसेवक आहेत. तर उर्वरित दक्षिण मुंबईतील पदाधिकारी आहेत. या माजी नगरसेवकांपैकी बहुतांशी नगरसेवक हे २००७ च्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत. ते गेली दहा वर्षे नगरसेवक नसून केवळ सुनील नरसाळे हे २०१७ मधील नामनिर्देशित नगरसेवक आहेत. देवरा यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दक्षिण मुंबईतील नगरसेवक त्यांच्यापाठोपाठ कॉंग्रेस सोडतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम आणि त्यांची कन्या निकिता हे देवरा यांच्या निकटचे मानले जातात. मात्र अद्याप तरी त्यांनी कॉंग्रेस सोडलेली नाही. धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक लोकप्रतिनिधी भाजप किंवा शिंदे यांच्या शिवसेनेत जातील याची शक्यता कमी असल्याचे मत कॉंग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than eight former corporator of congress in mumbai corporation going to join shiv sena and bjp soon print politics news asj