Melghat Assembly Constituency अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि मोर्शी या दोन मतदारसंघांतील उमेदवारीवरून महायुतीत चांगलाच पेच निर्माण झाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षातून बाहेर पडून शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले आमदार राजकुमार पटेल यांची उमेदवारीची वाट बिकट बनली आहे, तर मोर्शीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करणारे आमदार देवेंद्र भुयार यांच्या नावाला विरोध करताना ही जागा भाजपला मिळावी, असा आग्रह खासदार डॉ. अनिल बोंडे यानी धरल्याने भुयारांची अडचण झाली आहे.भाजपने त्यांच्या वाट्याच्या जिल्ह्यातील दोन मतदारसंघात पहिल्या यादीत उमेदवार निश्चित केले आहेत. त्याचवेळी महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच असलेल्या मेळघाट, मोर्शी, तिवसा या तीन मतदारसंघासाठी अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही.
बडनेरात महायुती ही युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तिवसामधून भाजपचा उमेदवार राहील, असे संकेत आहेत. अमरावतीची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) देण्यात आली आहे. दर्यापूरची जागा शिवसेनेला (एकनाथ शिंदे) मिळाली आहे. अचलपूर आणि धामणगाव रेल्वेतून भाजपने उमेदवार घोषित केले आहेत. आता महायुतीत मोर्शी आणि मेळघाट या दोन मतदारसंघांमध्ये भाजपने आग्रह धरल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>>Kishor Jorgewar: किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला मुनगंटीवार यांचा विरोध, दोन्ही नेते दिल्लीदरबारी
भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटची जागा भाजपला मिळावी, असाहट्ट धरला आहे. त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले केवलराम काळे यांना अग्रक्रम दिल्याची चर्चा आहे. याशिवाय माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, ज्योती माळवे याही इच्छुक आहेत. मोर्शीची जागा भाजपला मिळावी, यासाठी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे हे आग्रही आहेत. उमेश यावलकर, अमित कुबडे हे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.
आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. अजित पवार यांच्यामुळेच मतदारसंघात कोट्यवधींची विकास कामे होऊ शकली, असे ते सांगतात. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ही जागा मिळावी, यासाठी देवेंद्र भुयार यांनी भरपूर प्रयत्न केले. पण, अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या निवडणुकीत भुयार यांनी भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. बोंडे यांची खंत अजूनही कायम आहे.
भाजपला ही जागा गेल्यास आमदार देवेंद्र भुयार यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ते आता कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.