छत्रपती संभाजीनगर : लातूर आणि बीड जिल्ह्यांचे विभाजन करून उदगीर व अंबाजोगाई हे दोन जिल्हे व्हावेत आणि लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्याचे विभाजन होऊन कासारशिरशी हा तालुका व्हावा या मागणींसाठी आता आंदोलने उभी केली जात आहेत. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी तर उदगीर हा स्वतंत्र जिल्हा व्हावा या मागणीसाठी थेट राज्यपालांचीच भेट घेतली. कासारशिरशी तालुका निर्मितीसाठी आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामध्ये जुंपली आहे. भाजपचे नेतेच नव्या तालुका व जिल्हा मागणीची अर्ज घेऊन फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मराठवाडा विभागातील आयुक्तालयाचे विभाजन करण्याच्या प्रश्नावरूनही पूर्वी सत्ताधारी काँग्रेसमध्ये वाद झाला होता. आता तालुकानिर्मितीसाठी सत्ताधारी गटातून हालचाली सुरू झाल्या आहेत. अंबाजोगाई जिल्हानिहाय निर्मितीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री असताना विमल मुंदडा यांनी बहुतांश सरकारी कार्यालये अंबाजोगाई येथे आणली होती. महसूल विभागाचे नांदेड लातूर आणि औरंगाबाद असे त्रिभाजन केले तर जिल्ह्यांची संख्या वाढवून अशा सूचना पूर्वी करण्यात आल्या होत्या. नांदेड हा सर्वात मोठा जिल्हा असल्याने मराठवाड्याचे प्रशासकीय तीन भाग करण्याचा विचार या पूर्वी करण्यात आला होता. मात्र, तत्पूर्वी आता जिल्हा व तालुका निर्मितीची मागणी पुढे रेटली जात आहे.
हेही वाचा – कोल्हापूरमध्ये भाजपचा आता जिल्हाधिकाऱ्यांशी संघर्ष
हेही वाचा – अपयशी सरकारी योजनांची शिवसेनेच्या वतीने ‘होऊ दे चर्चा’
गेल्या काही महिन्यांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील काही गावांनी आम्हाला तेलंगणामध्ये जाण्याची परवनागी द्यावी असा अर्ज केल्यानंतर सीमा भागातील गावांची विकास योजना आखण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही. कासारशिरशी तालुक्याच्या मागणीवरून आंदोलने व्हावीत अशी रचना निलंगा तालुक्यात होऊ लागली आहे. निलंगा, औसा, अंबाजोगाई आणि नांदेड जिल्ह्यातील काही गावांमधून नव्या रचनेची मागणी आता होऊ लागली आहे.