नितीन पखाले
सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई सुरू झाल्यानंतर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी या गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात दिसल्या नाहीत. मात्र मंगळवारी सर्व दूरचित्रवाहिन्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्या ठळकपणे दिसल्या. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून मागे लागलेली सक्तवसुली संचालनालयाची चौकशी टाळण्यासाठीच खासदार गवळी या शिंदे गटात सहभागी झाल्या, अशी मतदारांची ‘भावना’ झाली आहे.
अवघ्या ४९ वर्षांच्या असलेल्या भावना गवळी या यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेकडून पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. दांडगा जनसंपर्क, कोणत्याही विषयांना थेट भिडण्याचा आक्रमक स्वभाव आणि या मतदारसंघातील जातीय समीकरणे यामुळे त्या सलग पाचव्यांदा खासदार झाल्या आहेत. वडील पुंडलिकराव गवळी यांचे बोट धरून त्या राजकारणात आल्या. १९९९ मध्ये त्या वाशिम लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या. तेव्हा राज्यातील सर्वांत लहान वयाच्या खासदार म्हणून त्यांचा लौकीक झाला होता. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर यवतमाळ-वाशिम या संयुक्त मतदारसंघातून २००४ पासून त्या सलग चारवेळा निवडून गेल्या आहेत. १३ व्या लोकसभेपासून त्या आज १७ व्या लोकसभेपर्यंत सलग खासदार आहेत. या काळात दोनदा केंद्रात युतीचे सरकार आले. तेव्हा पक्षाकडून केंद्रात मंत्री होण्याची खासदार गवळी यांची इच्छा पक्षाने पूर्ण केली नाही. मात्र २०१९ मध्ये त्या खासदार झाल्यानंतर पक्षाने त्यांची लोकसभेतील प्रतोद म्हणून निवड केली. खासदार म्हणून त्या पाचव्यांदा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र एवढ्या प्रदीर्घ कालावधीत कोणतीही ठोस विकास कामे त्यांच्या नावावर नसल्याचा आरोप त्यांचे विरोधक करतात. ज्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे श्रेय त्या घेतात तोही अन्य लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्याने मार्गी लागला, असे विरोधक सांगतात. गेल्या २५ वर्षांत खासदार भावना गवळी यांना विकासाची कोणतीही छाप पाडता आली नसल्याने नागरिकांमध्येही आता ओरड सुरू आहे. दरवेळी निवडणूक जिंकण्याबाबत त्या ‘राजकीय नशीबवान’ म्हणून प्रसिद्ध आहेत. भावनिक आणि जातीय समीकरणे, शिवसेनेमुळे दिग्रस-पुसद विधानसभा मतदारसंघातील मिळणारी बंजारा समाजाची एकगठ्ठा मते, मराठा, कुणबी मतांचे समीकरण त्यामुळे खासदार गवळी यांना प्रत्येकवेळी निवडणूक सोपी गेली.
हेही वाचा- केवळ २०२४ मधील विजयासाठी कृपाल तुमाने शिंदे गटात
दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने शिवसेनेतील नेत्यांविरोधात उगारलेल्या ‘ईडी’ चौकशीच्या बडग्याचा तडाखा खासदार गवळी यांना बसला. रिसोड (जि.वाशिम) येथील बालाजी पार्टिकल्स या कारखाना विक्री व अन्य आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात खासदार गवळी व त्यांच्या निकटवर्तीयांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीच्या फेऱ्यात घेरले आहे. विशेष म्हणजे वाशिम येथील शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख व बालाजी पार्टिकल कारखान्याच्या तत्कालीन संचालकांनी या कारखान्यातील गैरव्यवहारांविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून गवळी यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा सुरू आहे. त्याचा परिणाम खासदार गवळी यांच्या राजकीय प्रवासावरही झाला आहे. त्यामुळेच महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपशी हातमिळवणी केली तेव्हा, सर्वप्रथम भावना गवळी यांनी शिंदे गटाची बाजू घेतली व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या ‘मावळ्यां’च्या भावना समजून घेत निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला होता. तेव्हाच गवळी या भविष्यात शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर पक्षाने त्यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून हटवले. तेव्हा गवळी व त्यांच्या समर्थकांनी आपण अडचणीत असताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कधीच सहकार्य केले नाही, अशी तक्रार सुरू केली.
हेही वाचा- पक्षसंघटना टिकवण्यासाठी आदित्य ठाकरे २१ ते २३ जुलै या काळात ठाणे, नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर
गवळी यांची शिंदे गटाशी असलेली जवळीक बघता, गेल्याच आठवड्यात मुंबई येथे झालेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावना गवळींना आता पक्षात कुठलेही स्थान नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गवळी यांच्या समर्थकांनी यवतमाळमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. आता भावना गवळी यांनी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात शिंदे गटात प्रवेश केल्याने या विषयावर अधिकृत पडदा पडला. गवळी यांनी त्यांच्यावरील सक्तवसुली संचालनालयाची कारवाई थांबावी व केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी ही भूमिका घेतल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.