मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. जर कमलनाथ यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, तर काँग्रेससाठी हा सर्वांत मोठा धक्का असेल. अशातच ज्या कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला, त्यांना पक्षात घेऊन भाजपाला काय साधायचे आहे? यामागे भाजपाचा नेमका फायदा काय? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाच्या वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, कमलनाथ यांना भाजपात घेण्यामागे मुख्यत: दोन उद्देश आहेत. आधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आता कमलनाथ यांना पक्षात घेऊन, काँग्रेस आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनासुद्धा सांभाळू शकत नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे. तसेच राजकीय पटलावर इतर विरोधकांपेक्षा भाजपाच वरचढ असल्याचा संदेशही याद्वारे दिला जाणार आहे. त्याशिवाय भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले, “कमलनाथ भाजपात आल्यास भाजपाला पक्षनिधी उभारण्यासही मदत होईल. कारण- कमलनाथ यांचा पक्षनिधी उभारण्यात हातखंडा आहे. संकटाच्या काळात त्यांनी अनेकदा काँग्रेससाठी पक्षनिधी उभा केला आहे.”

हेही वाचा – राहुल गांधींनी घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन; ज्ञानवापी प्रकरणावर मौन

भाजपाच्या नेत्यांनी सांगितल्यानुसार, सध्या भाजपाची राष्ट्रीय परिषद सुरू आहे. या परिषदेनंतर कमलनाथ यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, की कमलनाथ हे काही नेते व काही कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशमध्ये आता अर्जुन सिंह यांचा म्हणावा तसा प्रभाव राहिलेला नाही. तसेच हिंदुत्वविरोधी वक्तव्यांमुळे दिग्विजय सिंग यांच्याविरोधात जनतेच्या मनात राग आहे. तर, ज्योतिरादित्य सिंदिया आधीच भाजपामध्ये आहेत. त्यामुळे कमलनाथ भाजपामध्ये आल्यास मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा एकही मोठा नेता उरणार नाही.

भाजपा नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, “कमलनाथ हे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी प्रयत्न करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना आपल्या राजकीय अस्तित्वाची चिंता आहे. आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवायचे असेल, तर त्यांना भाजपात प्रवेश केल्याशिवाय पर्याय नाही.”

हेही वाचा – “अरविंद केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला;” मुख्यमंत्री म्हणाले, “या लोकांना विधानसभा संपवायची…”

दरम्यान, कमलनाथ यांनी १९७० च्या दशकात युवक काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला केली. ते मूळचे उत्तर प्रदेशाच्या कानपूर येथील रहिवासी आहेत. १९८० मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आणीबाणीनंतरच्या काळात झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने छिंदवाडा आणि राजस्थानमधील नागौर या दोनच जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर कमलनाथ हे छिंदवाड्यातून नऊ वेळा खासदार राहिले. तसेच कमलनाथ हे पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्रीही होते. २०१८ मध्ये मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही झाले.