काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पक्षविरोधात काम केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या १५० नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच राज्य कार्यकारिणीदेखील विसर्जित करत नवी कार्यकारिणी घोषित करण्यात आली होती. अशातच आता लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून पुन्हा एकदा पक्षबांधणीस सुरूवात करण्यात आली आहे. मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले असून त्यांना मध्यप्रदेश काँग्रेसला गटातटाच्या प्रभावातून मुक्त करण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने काँग्रेसमधील अंतर्गत सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस पक्षाने जितू पटवारी यांना काही गटातटाच्या राजकारणातून पक्षाला मुक्त करण्याची तसेच जास्तीत जास्त तरुणांना पक्षाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी राज्याचा दौराही सुरु केला आहे. मध्यप्रदेश काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी ते जागोजागी मेळावे घेत आहेत, पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत.
हेही वाचा – भारताला भेट दिलेल्या युरोपियन प्रवाशांनी अयोध्या आणि श्रीरामाबद्दल काय लिहिले? वाचा..
“जितू पटवारी नव्याने पक्ष बांधण्याचा तसेच ज्येष्ठ आणि युवा नेते यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पक्षावर ज्येष्ठ नेत्यांचा प्रभाव आहे, अशा परिस्थिती जितू पटवारी यांच्यासाठी हे काम म्हणावे तितके सोप्पे नाही. राज्यात कमलनाथ आणि दिग्विजय सिंग हे दोन मोठे नेते आहेत. राज्यभरात त्यांचा प्रभाव आहे. अशावेळी पटवारी यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी पटवारी यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी कोणतेही मोठे नेते त्याठिकाणी उपस्थित नव्हते. मात्र, तरीही त्यांनी ज्येष्ठ नेत्यांचा मान ठेवत त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस हायकमांडही नाराज आहे”, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेश काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना दिली.
याबरोबरच अन्य एक ज्येष्ठ नेते यासंदर्भात बोलताना म्हणाले, “ही वस्तूस्थिती आहे की, जितू पटवारी यांची राजकीय कारकिर्द ही दिग्विजय सिंग यांच्या पाठिंब्यामुळे सुरु झाली. पटवारी यांना युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यापूर्वी पटवारी यांनी स्थानिक पातळीवर अनेकदा निवडणुका लढवल्या. मात्र, त्यांना अपयश आले, अशा परिस्थितही सिंग यांनी त्यांना संधी दिली. याशिवाय पटवारी यांचे संबंध कमलनाथ यांच्याशी चांगले राहिलेले नाहीत. अशातच पटवारी यांच्या कार्यलयातून २६ जानेवारीच्या एका कार्यमासाठी प्रकाशित केला पोस्टरमध्ये पटवारी यांच्या फोटोच नाही, शिवाय दग्विजय सिंग याचा मोठा फोटो आहे. हा एक स्पष्ट संकेत आहे.”
यासंदर्भात बोलताना अन्य एक ज्येष्ठ नेते म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेश काँग्रेसमध्ये काही बदल केले जातील. लोकसभा निवडणुकीनंतर पटवारी यांची संपूर्ण टीम बदलेल. पक्षबांधणीसाठी कोण्या एकावर जबाबदारी दिल्याची अशी कोणतीही माहिती नाही. पटवारी राज्याचा दौरा करून स्वत:साठी वातवरण निर्मिती करत आहेत. काही दिवसांत त्याचा कार्यकाळही संपेल. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर पक्षाची अवस्था बिकट झाली आहे.”
जितू पटवारी हे आपल्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान संघटना मजबूत करण्यावर भर देत आहेत. राज्यातील युवकांना आणि महिलांना राजकारणात येण्याचे आवाहन करत आहेत. एकंदरितच राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मध्यप्रदेशात येण्यापूर्वी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न पटवारी यांच्याकडून केला जातोय.
काँग्रेसचे माजी आमदार कुणाल चौधरी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हणाले, “माझ्यासारख्या युवा अभियंत्याला जितू पटवारी यांनी राजकारणात येण्याची संधी दिली. युवा नेतृत्वाला संधी देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.” तर काँग्रेस नेते पारस सकलेचा म्हणाले, “जितू पटवारी संपूर्ण राज्यभर फिरून तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या आणि सुचना ऐकून घेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.” त्यामुळे जितू पटवारी यांचा दौऱ्याचा काँग्रेसला किती फायदा होता आणि आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किती यश मिळेल, हे बघणं महत्त्वाचे ठरेल.