प्रबोध देशपांडे
शिवसेनेत तीन दशकांहून अधिक कालावधीपासून बुलडाणा जिल्ह्याचे राजकारण प्रतापराव जाधव यांच्या नावाभोवती फिरत आहे. मातब्बर नेते म्हणून प्रतापराव जाधव यांची ओळख. विधानसभेत व लोकसभेत सलग तीन वेळा ते निवडून आले. १९८९ पासून जिल्ह्यात शिवसेना रुजिवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. गेल्या महिन्याभरात तळ्यात-मळ्यात भूमिका घेणाऱ्या जाधवांनी अखेर शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. ३३ वर्षांपासून मातोश्रीसोबत निष्ठेचे शिवबंधन तोडून त्यांनी भविष्याच्या विचारातून नव्या मार्गावरील वाटचाल सुरू केली आहे. पुत्र ऋषिकेश जाधव याच्या राजकीय भविष्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
हेही वाचा- ‘ईडी’ची पिडा टाळणे हेच भावना गवळी यांचे लक्ष्य
प्रतापराव जाधव यांच्या राजकीय कारकीर्दीला मेहकर येथूनच सुरुवात झाली. २५ नोव्हेंबर १९६० रोजी मेहकर येथे जन्म झालेल्या प्रतापराव जाधव यांचे बी.ए, प्रथम वर्षापर्यंत शिक्षण झाले. गेल्या सव्वातीन दशकात मेहकरसह बुलडाणा जिल्ह्यावर त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखले. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी झपाटलेल्या जाधव यांनी १९८९ मध्ये राजकारणाला सुरुवात केली. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत त्यांनी यश मिळवले. १९९० मध्ये ते विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. मात्र, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतरच्या काळात प्रतापराव जाधव यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. मेहकर विधानसभा मतदारसंघातून १९९५ मध्ये सर्वप्रथम त्यांनी विधानसभा गाठली. पहिल्यांदाच आमदार झाले असतांनाही बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून प्रतापराव जाधवांची राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली होती. १९९९ आणि २००४ मध्ये ते मेहकरमधून पुन्हा विधानसभेवर निवडून आले. बुलडाणा जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा निर्माण झाला. पुढे २००९ मध्ये मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण त्याआधीच २००९ मधील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने त्यांना उतरवले. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्यावर २८ हजार मतांनी निसटता विजय मिळवला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये मोठ्या फरकाने प्रतापराव जाधव यांनी जागा कायम राखली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा प्रतापराव जाधवांविरोधात राजेंद्र शिंगणे यांना मैदानात उतरवले. दांडगा जनसंपर्क आणि राजकीय मोर्चेबांधणीत प्रतापराव जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा लोकसभा गाठली. एक लाख ३३ हजारपेक्षा अधिक मतांनी त्यांनी शिंगणे यांचा पराभव केला. मोदींच्या त्सुनामीने त्यांना तारले. शिवसेनेने सलग पाचव्यांदा बुलढाण्याच्या आपल्या अभेद्य गडावर भगवा झेंडा फडकावला. प्रतापराव जाधव यांच्या लोकसभेतील तिन्ही विजयात युतीमध्ये भाजपचे मोठे पाठबळ मिळाले.बुलडाणा लोकसभा मतदारसंघात रेल्वे, सिंचनासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. खामगाव-जालना रेल्वेमार्गाची अनेक वेळा घोषणा होऊनही अद्यापपर्यंत हा मार्ग होऊ शकला नाही.
हेही वाचा- केवळ २०२४ मधील विजयासाठी कृपाल तुमाने शिंदे गटात
बुलडाणा जिल्हा परिषद निवडणुकीत प्रतापराव जाधव यांचे पुत्र ऋषिकेश जाधव यांना पराभवाचा धक्का बसला होता. जिल्हा शिवसेनेत प्रतापराव जाधव यांचा शब्द अंतिम समजला जात होता. संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्या दोन विश्वासू आमदारांपाठोपाठ खासदार जाधवही शिंदे यांच्या तंबूत दाखल झाले आहेत. केंद्र सरकार स्तरावरील मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागण्यासाठी व पुत्र ऋषिकेश व स्वत:चे राजकीय भवितव्य लक्षात घेता प्रतापराव जाधवांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रतापराव जाधवांच्या निर्णयाचा बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असून जिल्हा शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.