मुंबई : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी केलेला दोषमुक्तीचा अर्ज लोकप्रतिनिधींसाठीच्या विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला. प्रकरण खटला चालवण्यासाठी पुन्हा माझगाव दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले. विशेष सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे, ठाकरे आणि राऊत यांना आता मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

ठाकरे आणि राऊत यांनी आरोप मान्य नसल्याचे यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर, महानगरदंडाधिकाऱ्यांनी दोघांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी पुन्हा झालेल्या सुनावणीच्या वेळी, ठाकरे आणि राऊत यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. आपल्याविरोधात कोणताही पुरावा नाही. आपल्यावर केलेले आरोपही संदिग्ध आहेत. या प्रकरणी आपल्याला गोवण्यात आले असून प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी मागणी ठाकरे व राऊत यांनी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे केली होती. शेवाळे यांच्यातर्फे या मागणीला विरोध करण्यात आला होता. युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगरदंडाधिकाऱ्यांनी ठाकरे व राऊत यांचा दोषमुक्तीच्या अर्ज फेटाळला होता.

हेही वाचा >>>Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणुकीच्या मैदानात उतरणार? कोण आहेत संजय पांडे?

या निर्णयाविरोधात दोघांनी विशेष सत्र न्यायालयात धाव घेऊन दोषमुक्तीची मागणी केली होती. महानगरदंडाधिकाऱ्यांनी निर्णय देण्यात चूक केल्याचा दावा केला होता. विशेष न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी निर्णय देताना ठाकरे व राऊत यांना दोषमुक्त करण्यास नकार दिला व प्रकरण पुन्हा महानगरदंडाधिकाऱ्यांकडे पाठवले.

Story img Loader