सोलापूर : शिवसेनेतील फुटीला एक वर्ष उलटत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीचे नाट्य घडून अजित पवार गट भाजपसोबत राज्यात सत्तेत सहभागी झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपची वाट आणखी मोकळी झाली आहे. याच पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचा समजला जाणारा बालेकिल्ला मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर केला. राष्ट्रवादीचे तत्कालीन सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात आता भाजपसमोर शत्रूच उरला नसल्याचे दिसत असले तरी याच सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत गटबाजी राजकारणात दोन ‘सिंह’ एकमेकांची शिकार करण्यासाठी योग्य टप्प्याची वाट पाहात आहेत.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि अकलूजच्या तालेवार मोहिते-पाटील घराण्यातील आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे दोन सिंह डरकाळ्या फोडत एकमेकांना आव्हान देत आहेत. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघरुपी संपूर्ण वनात राजकीय चलबिचलता दिसत आहे. या दोन्ही सिंहांमधील सुप्त संघर्षाला पक्षश्रेष्ठींसह उच्चपदस्थ नेते मंडळींकडूनच खच्चीकरणाच्या राजकारणात खतपाणी मिळते की काय, अशी शंकाही व्यक्त होत आहे.
हेही वाचा – वाशिम : मुसळधार पावसामुळे नद्या, नाले तुडुंब; नाला खोलीकरण, रुंदीकरण कामाचा खोळंबा
अनेक वर्षे राष्ट्रवादीत राहिलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रथमच राजकीय भूमिका घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक जाहीर सभेत विजयसिंह मोहिते-पाटील यांचा अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी सत्कार करून त्यांच्या स्वप्नातील कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह सांगली, सातारा, पुणे तसेच शेजारच्या मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड आदी सहा जिल्ह्यांतील ३६ दुष्काळी तालुक्यांमध्ये सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प विजयसिंह मोहिते-पाटील यांनी २००३-०४ साली ते उपमुख्यमंत्री असताना अट्टहासाने मंजूर करून घेतला होता. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला गेला आणि त्यात मोहिते-पाटील यांनाही मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली होती. या पार्श्वभूमीवर एकमेव कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्याचा शब्द भाजपकडून घेऊन मोहिते-पाटील कुटुंबीय भाजपवासी झाले.
आजही कृष्णा-खोरे स्थिरीकरण प्रकल्प आणि मोहिते-पाटील यांचे तयार झालेले समीकरण संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे त्यादृष्टीने सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना पूर्वी ते राष्ट्रवादीत असताना त्या पक्षातील अन्य लोकप्रतिनिधी समर्थन देण्यास कचरत होते. आता भाजपमध्येही मोहिते-पाटील हे आतापर्यंत या महत्त्वाच्या विषयाचा पाठपुरावा करीत आले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीत असताना मोहिते-पाटील यांना कृष्णा-खोरे स्थिरीकरण प्रकल्पाच्या मुद्यावर साथ देणे म्हणजे पवार काका-पुतण्यांची खप्पामर्जी ओढवून घेण्यासारखे होते. परंतु आता बलशाली सत्ताधारी भाजपमध्ये तशी परिस्थिती नाही. मोहिते-पाटील यांनीही एकमात्र कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची मागणी सोडून अन्य कोणतीही अपेक्षा न बाळगता भाजपमध्ये प्रवेश केला होता. ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीरपणे मान्य केली आहे. तथापि, अलिकडे याच कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या मुद्यावरून भाजपमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याचे दिसून येते.
हेही वाचा – मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वर्धेकर रस्त्यावर
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यात फारसा एकोपा राहिला नसून उभयतांमध्ये एकमेकांना जाणीवपूर्वक डावलून स्थानिक विकास कामांच्या आढावा बैठका घेणे, विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करणे, तसेच एकमेकांच्या विरोधकांशी सलगी करणे यासारखे राजकारण खेळले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची उमेदवारी कापून स्वतः उभे राहण्याची किंवा अन्य पर्याय उभे करण्याची तयारी मोहिते-पाटील यांनी चालविल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर खासदार नाईक-निंबाळकर यांनी मोहिते-पाटील यांच्या अपरोक्ष, त्यांच्याच जिव्हाळ्याच्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या प्रश्नावर मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासकीय बैठक लावली. यात कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे ‘पूर वळवणे’ (फ्लड डायव्हर्शन) या नावाखाली सर्वेक्षण करण्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या खर्चाला तत्वतः मंजुरी देण्यात आली.
या बैठकीस खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सोबत मोहिते-पाटील विरोधक मानले जाणारे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आदी उपस्थित होते. या बैठकीस मोहिते-पाटील यांनाही बोलावणे अपेक्षित होते. जबाबदार नेते म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तरी तशी किमान दक्षता घेणे अपेक्षित होते. अशा एका बैठकीस मोहिते-पाटील उपस्थित नव्हते खरे; परंतु यापूर्वी चार-साडेचार वर्षांत वेळोवेळी झालेल्या अनेक बैठकांना मोहिते-पाटील हजर होते, हे धैर्यशील मोहिते-पाटील यांचे म्हणणे खरे असले तरी शेवटी पक्षांतर्गत गटबाजीची ही पाऊलखूण नव्हे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याच नजरेतून खासदार रणाजितसिंह आणि आमदार रणजितसिंह या दोन सिंहांमध्ये सत्तासंघर्षाच्या वाढलेल्या डरकाळ्यांकडे पाहिले जाते.