मुंबई : मुंबई उपनगरातील प्राचीन, तसेच पांडवकालीन जोगेश्वरी आणि अंधेरी गुंफा पाहण्यासाठी दरवर्षी भारतासह परदेशातूनही लाखो पर्यटक येत असतात. मात्र सध्या या दोन्ही गुंफा जीर्णावस्थेत असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पत्र पाठवून या लेण्यांच्या जीर्णावस्थेकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. तसेच देखभाल व संवर्धन करण्याचीही मागणी केली आहे.
जोगेश्वरी आणि अंधेरी या दोन्ही गुंफा रवींद्र वायकर यांच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आहेत. मात्र सध्या जोगेश्वरी आणि अंधेरी या पांडवकालीन लेण्यांच्या आतील आणि बाहेरील अनेक भाग अतिशय जीर्ण झाले आहेत. जर या पांडवकालीन लेण्यांची निगा, देखभाल आणि योग्य दुरुस्तीचे काम केले नाही, तर या प्राचीन गुंफा आपण गमावून बसू. त्यामुळे या दोन्ही गुंफांच्या देखभाल व संवर्धनासाठी आपण वैयक्तिक लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत. जेणेकरून लुप्त होत चाललेला हा प्राचीन वारसा आपण जतन करू शकू, असे वायकर यांनी गजेंद्र सिंह शेखावत यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. भविष्यातील पिढीसाठी सांस्कृतिक वारशाचे जतन व पुरातन वास्तूंचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही वायकर यांनी पत्रात म्हटले आहे.