जयेश सामंत
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांनी आतापर्यंत साथ दिली असली तरी या बंडामागील खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे ठाणे, डोंबिवलीतील वर्तुळात बोलले जाते. कल्याण लोकसभा मतदारसंघात संघ परिवाराला मानणारा एक मोठा वर्ग खूप आधीपासून कार्यरत आहे. कल्याण डोंबिवलीतील हा हक्काचा मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने राहिला तर दुरावण्याची भीती पहिल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या गोटात व्यक्त होत होती. गेल्या सात वर्षांत या मतदारसंघात राज्य सरकारच्या माध्यमातून खासदार शिंदे यांनी शेकडो कोटी रुपयांचा विकास निधी आणला. पायाभूत सुविधांचे अनेक मोठे प्रकल्प त्यांच्या माध्यमातून सुरू झाले. तरीही महाविकास आघाडीसोबत राहणे तितकेसे हितकारक ठरणार नाही ही डाॅ.श्रीकांत शिंदे यांची पहिल्यापासून भूमिका होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करणार नाही असा ‘आवाज’ त्यांनी जाहीरपणे महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मनात बंडाची पहिली ठिणगी खासदार पुत्रानेच शिलगावली हे मानण्यास जागा आहे.
हेही वाचा… मुलाच्या राजकीय भविष्यासाठी प्रतापराव जाधव यांनी तोडले ३३ वर्षांचे ऋणानुबंध
नव्याने रचना झालेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेतून पहिल्यांदा आनंद परांजपे निवडून आले होते. प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला सुरुवातीला जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून आणि त्यानंतर पुनर्रचित कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने निवडून आणले. आनंद यांच्या विजयाचे खरे शिल्पकार तेव्हाचे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे हेच ठरले होते. आनंद परांजपे हे शिंदे यांचे मानसपुत्र म्हणून ठाणे, डोंबिवलीच्या राजकारणात ओळखले जात. पुढे आनंद यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि त्याचा मोठा धक्का एकनाथ शिंदे यांना बसला. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आनंद यांच्या विरोधात राजकारणाचा गंधही नसलेल्या उच्चविद्या विभूषित असलेल्या आपल्या पुत्राला शिंदे यांनी रिंगणात उतरविले आणि निवडूनही आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत सलग दोन वेळा लोकसभेत तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने डाॅ.श्रीकांत निवडून गेले. २०१४ मध्ये राजकारणात नवखे वाटणाऱ्या श्रीकांत यांनी अल्पावधीतच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वत:चा जम बसवला. या महापालिका क्षेत्रात शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग आहे. जुन्या जाणत्या शिवसेना नेत्यांना सोबत घेत असतानाच खासदार शिंदे यांनी स्वत:ची अशी एक नवी फळी शिवसेनेत उभी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीतील मातब्बर नेत्यांना सोबत घेतले. उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण पट्टयातही खासदार शिंदे यांनी स्वत:ला मानणाऱ्या पदाधिकारी आणि नगरसेवकांची फळी उभी करण्यास सुरुवात केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपले मताधिक्य राज्यात सर्वाधिक असावे यादृष्टीने त्यांचे प्रयत्न होते. मात्र लगतच असलेल्या ठाणे लोकसभेच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने राजन विचारे यांच्या तुलनेत डाॅ.श्रीकांत यांचे मताधिक्य कमी राहिले. विजयाचे मताधिक्य तीन लाखापेक्षा अधिक होते तरीही विजय आणखी मोठा हवा होता अशी खंत ठाणे, डोंबिवलीत डाॅ.श्रीकांत यांच्यासाठी अहोरात्र राबणारी आणि ‘टीम डाॅक्टर’ म्हणून ओळखली जाणारी निकटवर्तीयांची फळी व्यक्त करत होती. तेव्हाच शिंदे यांच्या खासदार पुत्राची महत्त्वाकांक्षा किती मोठी असू शकते याचे प्रत्यंतर राजकीय वर्तुळात सर्वांना येऊ लागले होते.
हेही वाचा… ‘ईडी’ची पिडा टाळणे हेच भावना गवळी यांचे लक्ष्य
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवी राजकीय समीकरणे मांडली गेली खरी मात्र खासदार शिंदे यांना तितकीशी ती पसंत नव्हती असेच चित्र पहिल्यापासून पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या प्रस्तावानुसार मुख्यमंत्रीपद थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आणि तळागाळात राबूनही एकनाथ शिंदे यांना या पदाने हुलकावणी दिल्याची बोच खासदार शिंदे यांनाही होती. ते स्वत: याविषयी वाच्यता करणे शिताफीने टाळत असत मात्र त्यांच्या निकटवर्तीयांच्या वर्तुळात ही खंत अनेकदा व्यक्त होताना दिसत होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपला मानणारा एक मोठा वर्ग आहे. इतका ‘सुरक्षित’ मतदारसंघ हातचा सोडून महाविकास आघाडीच्या तंबूत निवारा शोधणे राजकीयदृष्ट्या योग्य नाही असेच खासदार शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचे मत होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करणार नाही असा थेट ‘आवाज’ त्यांनी राज्याचे तत्कालिन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिला होता. त्यासाठी त्यांनी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनाही सोबत घेतले होते. जेथे स्वत:ला जाहीर भूमिका मांडता येत नाही तेथे म्हस्के यांना बोलायला लावायचे असे त्यांचे धोरण होते.