मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा उमेदवारी नाकारलेल्या सर्वपक्षीय माजी खासदारांना विधानसभेचे वेध लागले आहेत. आमदारकी मिळविण्यासाठी या माजी खासदारांचा खटाटोप सुरू आहे.

लोकसभेत पराभूत झाल्याने काही जणांना विधानसभेवर निवडून येण्याची घाई झाली आहे. बीड मतदारसंघातून लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदवर निवड करून भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. अन्य पराभूतांनाही आपले राजकीय पुनर्वसन व्हावे, अशी इच्छा आहे.

मराठवाडा

● औरंगाबाद मतदारसंघाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही विधानसभेचे वेध लागले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उतरण्याचे त्यांनी सुतोवाच केले आहे.

● लातूरचे भाजपचे पराभूत उमेदवार माजी खासदार सुधाकर श्रृगांरे यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

● छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाही विधानसभेचे वेध लागले आहेत.

हेही वाचा >>>कौटुंबिक कलह टाळण्यासाठी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांची माघार

उत्तर महाराष्ट्र

● दिंडोरी मतदारंसघातून पराभूत झालेल्या माजी राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही विधानसभा निवडणूक लढवायची आहे.

● नंदुरबारमधून पराभूत झालेल्या माजी खासदार हिना गावीत यांनाही आमदारकीचे वेध लागले आहेत. पक्षाने सूचना केल्यास आम्ही विधानसभेची निवडणूक लढवू, असे डॉ. पवार आणि हिना गावीत यांनी सांगितले.

● दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पराभूत झालेले शिवसेनेचे (शिंदे )माजी खासदार राहुल शेवाळे यांनी चेंबूर मतदारसंघातून विधानसभा लढवावी, असा पक्षाचा आग्रह असल्याचे सांगण्यात येते.

● ठाणे लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले शिवसेनेचे (ठाकरे) माजी खासदार राजन विचारे हे ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. २००९ मध्ये त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

● भिवंडी मतदारसंघातून पराभूत झालेले माजी राज्यमंत्री भाजपचे कपिल पाटील यांनी आमदारकीसाठी चाचपणी केली.

विदर्भ

● चंद्रपूरमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही विधानसभा निवडणूक लढवायची आहे. मुळात मुनगंटीवार यांना दिल्लीत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पक्षाच्या आग्रहामुळे ते लढले पण अडीच लाखांच्या मताधिक्याने पराभूत झाले. महायुतीची पुन्हा सत्ता आल्यास मंत्रिपद शाबूत राहावे यासाठी मुनगंटीवार यांचा प्रयत्न आहे.

हेही वाचा >>>नांदेड पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी, सहानुभूतीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न

पश्चिम महाराष्ट्र

● पुणे लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर हे पु्न्हा विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत.

● सोलापूरमधून पराभूत झालेले भाजपचे आमदार राम सातपुते हे पुन्हा माळशीरस मतदारसंघातून नशीब अजमविण्याच्या तयारीत आहेत.

● सातारा मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) शशिकांत शिंदे हे पण निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

मुंबई ठाणे

● ईशान्य मुंबईतून लोकसभेला पराभूत झालेले भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांना मुलुंड मतदारसंघातून पुन्हा विधानसभा लढायची आहे.

● उत्तर मुंबईतून भाजपने उमेदवारी नाकारलेले माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना बोरिवली मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी हवी आहे.

● दक्षिण मुंबईत पराभूत झालेल्या शिवसेनेच्या (शिंदे) आमदार यामिनी जाधव किंवा त्यांचे पती यशवंत जाधव यांना भायखळा मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे.