सत्तर वर्षांहून अधिक काळ केंद्र आणि राज्यात सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला निवडणूक राजकारणातील अपयशामुळे गेल्या काही वर्षांत वाईट स्थितीतून जावे लागत आहे. मात्र तरीही या पक्षातील नेत्यांना त्यांची पक्षावरील पकड सुटू नये, असे कायम वाटत असते. ज्यांना जनमानसात स्थान नाही ते दरबारी राजकारणात तरबेज असतात. ते दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून जनमानसात स्थान असलेल्या नेत्याचे पाय ओढण्याचे प्रयत्न करतात. काँग्रेसमधील हे चित्र पारंपरिक आहे. त्याचा नवा प्रयोग सध्या नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यांचे पक्षातील स्थान डळमळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्या नेत्याचे नाव आहे माजी मंत्री, चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले सुनील केदार आणि जे हे करीत आहेत ते दिल्लीतील नेते. त्याला पार्श्वभूमी आहे प्रदेशाध्यक्ष नियुक्तीची.

विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्तीसाठी काही नावे पुढे आली. यात एक नाव माजी केंद्रीय मंत्री, बुलढाणा, रामटेकचे माजी खासदार मुकुल वासनिक यांचेही होते. गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ ही एकमेव त्यांची जमेची बाजू. त्यांच्या नियुक्तीबाबत पक्षातील नेत्यांकडून कौल घेण्यात आला तेव्हा अनेक नेत्यांनी वासनिक यांच्या नावाला विरोध केला. त्यात अग्रस्थानी होता नागपूर जिल्हा व येथील नेते सुनील केदार.

काँग्रेस श्रेष्ठींनी दुसऱ्या नावाचा शोध सुरू केला. पण ही जबाबदारी स्वखुशीने स्वीकारण्यासाठी प्रस्थापित नेते इच्छुक नव्हते. मग स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून पक्षाचे काम करणारा, भविष्यात ईडी व अन्य केंद्रीय तापस यंत्रणांच्या चौकटीत न येऊ शकणाऱ्या अशा नेत्याला ही जबाबदारी देण्याचे ठरले. त्यात बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ चपखल बसले आणि त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली.

सपकाळांचे वासनिक कनेक्शन

प्रदेशाध्यक्षपदी सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर नागपूर जिल्हा काँग्रेसची समीकरणे बदलली. त्याला कारणीभूत ठरले ते सपकाळांचे वासनिक कनेक्शन. मुकूल वासनिक १९८४ ते १९८९, १९९१ ते १९९६ या काळात बुलढाणाचे खासदार होते. सपकाळ हे वासनिक यांचे पट्टशिष्य मानले जातात. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीत वासनिक यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाल्यानंतर वासनिक नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून त्यांचा नागपूर जिल्ह्यातील राजकारणाशी संबंध आला. नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांचा प्रभाव आहे. २०१४ घ्या लोकसभा निवडणुकीत वासनिक यांचा पराभव झाला. येथून वासनिक – केदार गटांत वाद सुरू झाले. केदार विरोधी गटाने वासनिक यांच्या मदतीने जिल्हा काँग्रेसवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २०२४ च्या निवडणुकीत रामटेकची जागा काँग्रेसने जिंकली त्यात महत्वाचे योगदान केदार यांचे होते.

हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्याने वासनिक गट पुन्हा सक्रिय झाला आहे. हा गट आपल्याला दूर सारण्याचा प्रयत्न करू शकतो ही भावना केदार गटाची आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीवर केदार गटाने बहिष्कार टाकला होता. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मुंबईत बोलावलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत केदार मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या जिल्हा काँग्रेसला कार्यकारी अध्यक्ष आहे. तेथे नवीन अध्यक्ष नियुक्त केला जाणार आहे. तो करताना केदार यांना विश्वासात घ्यावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे तर वासनिक गटाचा याला विरोध आहे.