संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९०च्या दशकात देशाच्या राजकारणात मंडल – मशीद या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले. व्ही. पी. सिंह, लालकृष्ण अडवाणी, मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव आदी नेत्यांना महत्त्व प्राप्त झाले. मंडलच्या मुद्द्यावर व्ही. पी. सिंह यांनी आपले नेतृत्व अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी रामजन्मभूमी – बाबरी मशीद वादात लालकृष्ण अडवाणी आणि मुलायमसिंह यादव या दोन नेत्यांना वेगळे बळ मिळाले. बाबरी मशीद पडल्यावर देशाच्या राजकारणाचे चित्र बदलत गेले तसे मुलायमसिंह यादव यांचे नेतृत्व बहरले.

हेही वाचा… कारसेवकांवर गोळीबार ते स्वत:च्याच मृत्यूची घोषणा करण्याचे आदेश; मुलायम सिंह यांच्या आयुष्यातील पाच लक्षवेधी प्रसंग

कुस्तीगीर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री असा मुलायमसिंह यादव यांचा राजकीय प्रवास. लोहियावादी मुलायमसिंह हे १९६७ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून आले. त्यानंतर समाजवादी चळवळीत त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

उत्तर प्रदेशचे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या मुलायमसिंह यादव यांचे नेतृत्व बाबरी मशीद पाडण्यात आल्यावर खऱ्या अर्थाने बहरले, असेच म्हटले जाते. समाजवादी चळवळीतील नेत्यांमध्ये नेहमीच वाद होत असत. त्यातून जनता पक्ष किंवा जनता दलाची अनेक शकले झाली. जनता दलातून बाहेर पडत मुलायमसिंह यादव यांनी १९९२ मध्ये समाजवादी पार्टीची स्थापना केली. त्याच दरम्यान बाबरी मशीद पाडण्यात आली. मुलायमसिंह यादव यांनी संधी ओळखून उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत सुमारे २० टक्के वाटा असलेल्या मुस्लिमांची बाजू उचलून धरली. बाबरी मशीद वादाचा सुरुवात ही राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळापासून झाली होती. यामुळे उत्तर प्रदेशात पारंपारिक काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या मुस्लीम समाजात काँग्रेसबद्दल संतप्त भावना होती. मुलायम यांनी ही पोकळी भरून काढली. बाबरी मशीद पाडल्यावर देशभर दंगली उसळल्या. मुलायमसिंह यांनी मुस्लीम समाजाला धीर दिला. त्याचा त्यांना राजकीय लाभ झाला. पुढील वर्षी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुलायम यांच्या समाजवादी पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या. बसपाच्या मदतीने मुलायम मुख्यमंत्री झाले.

हेही वाचा… Mulayam Singh Yadav Death: मोदीही हळहळले! मुलायम यांच्यासोबतचे आठ फोटो पोस्ट करत म्हणाले, “मी कायम त्यांची मतं…”

मुस्लिमांची बाजू घेतल्याने मुलायम यांचा उल्लेख तेव्हा ‘मुल्ला मुलायम’ असा केला जात असे. उत्तर प्रदेशच्या सत्तेसाठी मुलायम यांनी यादव – मुस्लीम हे समीकरण तयार केले. सुमारे २० टक्के मुस्लीम आणि आठ ते दहा टक्क्यांच्या आसपास असलेला यादव समाज अशा समीकरणाने समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा बाज बदलून टाकला. २०१२च्या विधानसभा निवडणुकीत या समीकरणानेच समाजवादी पार्टीला स्वबळावर उत्तर प्रदेशची सत्ता मिळाली होती.

पाहा व्हिडीओ –

मुस्लिमांचे नेते अशी मुलायम यांची प्रतिमा तयार झाली. देशभर विविध राज्यांमध्ये मुस्लीम समुदायात मुलायम यांना पाठिंबा मिळत गेला. समाजवादी पार्टीचा त्यातून विस्तारही झाला. पण मुस्लीमांचे नेते किंवा मुल्ला मुलायम अशी ओळख झाल्याने हिंदुत्ववादी त्यांच्यापासून दूर गेले. त्याचा समाजवादी पार्टीला काही प्रमाणात फटकाही बसला. देशाच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्ष हा मुस्लिमांचा तारणहार अशी प्रतिमा होती. बाबरी मशीद पडल्यावर मुलायम यांनी ही जागा घेतली होती.

हेही वाचा… मुलायम सिंह यांच्या निधनानंतर शरद पवारांकडून शोक व्यक्त; म्हणाले, “समाजवादी चळवळीचं…”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना स्वतंत्र उत्तराखंडसाठी झालेले आंदोलन बळाचा वापर करून चिरडून टाकण्याचा आरोपही तेव्हा मुलायम यांच्यावर झाला होता.

पंतप्रधानपदाची इच्छा अपूर्ण

१९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे १३ दिवसांचे सरकार पडल्यावर पर्यायी सरकार स्थापन करण्यास वेग आला होता. विविध नेते पंतप्रधानपदासाठी इच्छुक होते. तेव्हा मुलायमसिंह यादव यांनीही पंतप्रधानपदासाठी प्रयत्न केले होते. पण त्यांना विविध पक्षांच्या नेत्यांचे समर्थन लाभू शकले नाही. यातून पंतप्रधानपद भूषविण्याची त्यांची इच्छा पुढेही पूर्ण होऊ शकली नाही. केंद्रात त्यांनी संरक्षणमंत्रीपद भूषविले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulayam singh yadav who made impact on national politics print politcs news asj
Show comments