मुंबई: देशाची ‘आर्थिक राजधानी’ मुंबईवर वर्चस्व कोणाचे राहणार या गेली अडीच महिने सुरु असलेल्या चर्चेला निवडणूक निकालानंतर पूर्ण विराम मिळाला. मुंबईतील एकूण सहा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीने आपली ताकद दाखवली. आघाडीच्या मुंबईतील चार विजयांपैकी तीन जागांवर विजय हा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांचा झाला आहे. अमोल कीर्तीकर यांचा निसटता पराभव झाला असला तरी त्यांनी वायकर यांना दिलेली चुरशीची लढत लक्षवेधी ठरली. उत्तर मध्य मुंबईतील काँग्रसेच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विजयात ठाकरे गटाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मुंबईत आवाज ठाकरेंचा हेच स्पष्ट झाले.
शिवसेनेत फूट पडल्यावर ४० आमदार आणि १३ खासदार, शेकडो नगरसेवकांनी सोडलेली साथ, गेली २५ वर्षे साथ सोबत देणारे धनुष्यबाण आणि नावाचा अभाव, या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोणाला साथ देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष होते. दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधवमध्ये झालेल्या सरळ लढतीत सावंत यांनी बाजी मारली. जागावाटपात शिंदे गटाने मुंबईतील तीन जागा प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. यात दक्षिण मुंबईच्या जागेचा समावेश होता. जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सावंत यांनी अर्धी लढाई जिंकली होती. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत ठाकरे गटाचे व्यवस्थापन गुरु अनिल देसाई यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा ५३ हजार मतांनी पराभव केला. मुलुंड, भांडुपचा भाग असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी भाजपच्या मिहिर कोटेचा यांचा २९ हजार मतांनी पराभव केला. उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपचे ॲड उज्जव निकम यांचा १६ हजार मतांनी पराभव केला. गायकवाड यांनी देसाई यांना मदत केली. ठाकरे गटाने गायकवाड यांना हात दिला. ‘ताई तुला दिल्लीत पाठवायचे आहे’ हा उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला.
हेही वाचा – तिहार तुरुंगातून ओमर अब्दुल्लांचा पराभव करणारे राशिद शेख कोण आहेत?
हेही वाचा – मायावतींच्या बसपाला उतरती कळा; मतदारांनी का नाकारलं?
वायव्य मुंबईतील लढत निकराची झाली. शिंदे गटाचे रविंद्र वायकर हे केवळ ४८ मतांनी निवडून आले. अमोल कीर्तीकर यांनी दिलेली लढत लक्षवेधी ठरली. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानभूती, दलित आणि मुस्लिम मतदारांचा महाविकास आघाडीकडे झुकलेला कल, आघाडीतील पक्षांनी एकदिलाने केलेले काम आणि मुंबईतील मराठी मत टक्याने ठाकरे गटाला दिलेली साथ यामुळे मुंबईत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आवाज कायम राहिला आहे.
© The Indian Express (P) Ltd