मुंबई : आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा महायुतीचा निर्धार असला तरी मुंबईत २२ जागा जिंकलेल्या महायुतीने केवळ दोघांनाच मंत्रीपदाची संधी दिली आहे. शिवसेनेच्या मुंबईतील एकाही आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.

मुंबईतील मंगलप्रभात लोढा आणि अॅड. आशीष शेलार या भाजपच्या दोघांनाच संधी मिळाली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ पैकी १५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाने १० तर शिंदे गटाने सहा जागा जिंकल्या. काँग्रेस तीन तर राष्ट्रवादी (अजित पवार) व समाजवादी पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली.

हेही वाचा >>>भाजपचे धक्कातंत्र : रवींद्र चव्हाण लवकरच प्रदेशाध्यक्षपदी?

मुंबईतील भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले होते. केवळ शेलार आणि लोढा यांचाच समावेश झाला. शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने मुंबई भाजपचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता असेल. आशीष शेलार यांचा समावेश करून शिवसेना ठाकरे गटाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे हे स्पष्ट होते.

ठाकरे गटाला टीकेची संधी

पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पराभव करण्याची शिंदे गटाची योजना असली तरी शहरातून सहा आमदार निवडून येऊनही एकालाही शिंदे यांनी मंत्रीपद दिलेले नाही. प्रकाश सुर्वे हे मंत्रीपदासाठी इच्छुक होते, पण त्यांनाही संधी दिलेली नाही. मुंबईत एक तरी मंत्रीपद मिळाले असते तर ठाकरे गटाला शह देण्यास फायदा झाला असता. उलट आता ठाकरे यांना टीका करण्यास संधी मिळाल्याची भावना ठाकरे गटाच्या एका नेत्याने व्यक्त केली.

Story img Loader