मुंबई : भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले असून एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे महायुतीसाठी मुंबईतील सर्वात कठीण मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपने निकम यांची निवड करण्याचे ठरविले आहे.
या मतदारसंघात मुस्लिम व ख्रिश्चन मतदारांची संख्या पाच-सहा लाख असून त्यांचे मतदान शक्यतो भाजपविरोधात जाते. विलेपार्ले, चांदिवली, कुर्ल्यातील काही भाग, कालिना, वांद्रे सरकारी कॉलनी आदी भागात मराठी, उत्तर भारतीय व अन्य मतदार आपल्याबरोबर राहतील, असे भाजपला वाटत आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे ‘ मातोश्री ‘ निवासस्थान असून ठाकरे गटाचीही ताकद मोठी आहे. खासदार पूनम महाजन या २०१९ मध्ये एक लाख ३७ हजार मतांनी निवडून आल्या होत्या. पण या विजयात ठाकरे गटाचीही किमान दीड-दोन लाख मते आहेत. महाजन यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या तक्रारी, मतदारांशी पुरेसा संपर्क नसणे, आदी बाबींमुळे भाजपने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली नाही.
हेही वाचा : जातीय समीकरणं साधत काँग्रेसने हरयाणात जाहीर केले उमेदवार; भाजपाला रोखण्यासाठी विशेष डावपेच
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना भाजप नेत्यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारणातच रहायचे असल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे अन्य नावांबरोबरच भाजपने निकम यांच्याबाबतही विचार केला व त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले. निकम यांचे ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असून त्याचा त्यांना उपयोग होईल. मुंबईतील १९९३ चे साखळी बाँबस्फोटातील अतिरेकी आणि मुंबईवरील हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणातही निकम यांनी पोलिसांसाठी बाजू मांडली आहे.
हेही वाचा : हाथरस बलात्कार प्रकरणामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेस-सपा भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का?
निकम यांनी देशविरोधी कारवायांमधील अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी बजावलेल्या भूमिकेचा या मतदारसंघात चांगला राजकीय उपयोग होईल, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळेच मुंबईतील भाजपच्या विजयासाठी सर्वाधिक कठीण मतदारसंघात भाजप राजकारणात नवख्या उमेदवाराचा पर्याय अजमावणार आहे. मात्र निकम यांच्या काही लंगड्या बाजूही असून त्यांच्याविरोधात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे निकम यांना विजय मिळविणे अवघडच असणार आहे.