पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू होताच पुणे लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमांतून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर इच्छुक उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी लोकसंपर्क आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मोहोळ हे राज्याचे उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची साथ घेत रक्तदान शिबिर, दिवाळी फराळ कार्यक्रम करत, तर मुळीक यांनी बागेश्वर महाराज यांचा सत्संग कार्यक्रम घेऊन शहरभर संपर्क साधला आहे. त्यामुळे मोहोळ यांना चंद्रकांतदादा पावणार की, मुळीकांना बागेश्वर बाबा पावणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदाराच्या माध्यमातून पुण्याचे नेतृत्त्व कोणाच्या हाती जाणार, याबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. पोटनिवडणूक न झाल्याने आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये पुण्याची जागा ही भाजपकडे असणार, हे उघड आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. सुनील देवधर यांचे नाव चर्चेत येताच मोहोळ आणि मुळीक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. उमेदवारी मिळविणे, हेच त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत राहण्याशिवाय दोघांपुढे पर्याय राहिलेला नाही.
हेही वाचा : भाजपाच्या माजी आमदाराची ‘सेक्युलर’ कविता वगळली; गोव्यातील चित्रपट महोत्सवाला वादाची फोडणी
पुणे लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारे मतदार मोठ्या संख्येने आहेत. देवधर हे संघाचे माजी प्रचारक आहेत. त्यांनी दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देवधर यांच्याकडे होती. तसेच २०१८ मध्ये त्रिपुरा येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. आता देवधर यांनीही पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी लोकांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत.
देवधर यांच्यामुळे मोहोळ आणि मुळीक यांची अडचण झाली आहे. मोहोळ यांना चंद्रकांत पाटील यांची साथ आहे, रक्तदान शिबिर आणि दिवाळी फराळ कार्यक्रम घेत त्यांनी लोकसंपर्कावर भर दिला आहे. मुळीक यांनी बागेश्वर महाराज यांच्या सत्संगाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाची उलटसुलट चर्चा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे मुळीक यांचे पारडे सध्या जड झाले आहे. त्यामुळे मोहोळ यांना चंद्रकांतदादा पावणार की मुळीक यांना बागेश्वर बाबा पावणार, अशी चर्चा शहरात आहे.